तोतया डॉक्टरचा तब्बल २० वर्षे व्यवसाय
नवी मुंबई: खारघर, सेक्टर-१० मधील कोपरा गांवामध्ये बोगस डीग्रीच्या सहाय्याने सिटी हॉस्पिटल नावाचे क्लिनीक उघडून परिसरातील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळणार्या विठ्ठल रंगनाथ मुंडे या बोगस डॉक्टराला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. दहावी नापास असलेल्या या बोगस डॉक्टरने आपल्याकडे एम.डी.(मेडिसीन), डी.एम.(कार्डिओलॉजी) डिग्री असल्याचे भासवून कोपरा गाव येथे दिड वर्षे आपला वैद्यकिय व्यवसाय केल्याचे आढळून आले आहे.
विठ्ठल मुंडे याने एका डॉक्टरकडे कंपाऊंडरचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याआधारे त्याने नवी मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना थाटल्याचे तपासात आढळून आले आहे. विशेष म्हणजे गेल्या २० वर्षाहुन अधिक काळ बोगस डॉक्टर मुंडे विविध ठिकाणी आपला दवाखाना थाटून रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असताना देखील सदर बाब कुणाच्याच लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बोगस डॉक्टर विठ्ठल मुंडे मुळचा बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथ भागातला असून तो दहावी नापास आहे. त्यामुळे त्याने २० वर्षापूर्वी एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून कामाला सुरुवात केली होती. याचदरम्यान त्याने कुठल्या आजारावर कुठली औषधे दिली जातात, सलाईन कशाप्रकारे लावले जाते याचे प्रशिक्षण घेतले. छोट्यामोठ्या आजारांवर औषध देण्याची माहिती मिळाल्यानंतर विठ्ठल मुंडेने स्वत:चा दवाखाना थाटून गोर-गरीब रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षामध्ये त्याने घणसोली, कामोठे, खारघर, उलवे, उरण आदि ठिकाणच्या गरीब वस्त्यांमध्ये आपला दवाखाना थाटून अनेक गोर-गरीब रुग्णांवर उपचार केल्याचे तपासात आढळून आले आहे. मुंडे एका ठिकाणी सहा महिने ते एक वर्ष एवढ्या काळासाठी दवाखाना सुरु ठेवत असे. त्यानंतर तो दुसर्या ठिकाणी दवाखाना थाटून आपला वैद्यकीय व्यवसाय बिनदिक्कतपणे करत असल्याचे आढळून आले आहे. नंतर त्याने जास्त पैश्यांच्या लोभापायी गरीब वस्त्यांऐवजी नवीन होणार्या कॉम्प्लेक्समध्ये आपले क्लिनिक थाटून उच्चभू आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये त्याने कोपरा गावातील नवीन कॉम्प्लेक्समध्ये गाळा भाड्याने घेऊन सदर ठिकाणी सिटी हॉस्पीटल नावाने क्लिनिक थाटून वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता. स्वतःच्या नावासमोर फिजीशिअन, कार्डिओलॉजिस्ट, डायबेटॉलॉजिस्टच्या पदव्या लावून तसेच स्वतःच्या विझीटींग कार्डवर लाईफ लाईन हॉस्पीटल, स्टर्लिंग व्होकार्ट हॉस्पीटल, हिरानंदानी हॉस्पीटल, अशा प्रतिष्ठीत हॉस्पीटलमध्ये कार्यरत असल्याचे दर्शवून त्याने रुग्णांची लूट करुन त्यांच्या आरोग्याशी खेळण्यास सुरुवात केली. याठिकाणी त्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करुन त्यांना तीस-तीस हजारांचे इंजेक्शन देण्याचा बहाणा करुन तसेच रुग्णांना आठ-आठ दिवस बोलावून रोज सलाईन लावून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपले बिंग फुटेल या भितीने तेथून काढता पाय घेतला. येथून जाताना देखील त्याने काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये उसने घेऊन पलायन केले.
दरम्यान, बोगस डॉक्टर विठ्ठल मुंडे खारघरमध्ये सिटी हॉस्पीटल चालवत असताना, त्याच्याकडे मनोज घरत नामक व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंबिय उपचार घेत होते. त्यावेळी मनोज घरत यांना डॉ. मुंडे याच्या वैद्यकीय डिग्री बाबत संशय आला. मात्र, तोपर्यंत तो फरार झाला होता. त्यामुळे घरत यांनी महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलकडे संपर्क साधून डॉ. मुंडेच्या डिग्रीबाबत खातरजमा केल्यानंतर मेडीकल कौन्सिलने तो डॉक्टर असल्याबाबत कुठल्याही प्रकारची नोंद त्यांच्याकडे नसल्याची माहिती दिली. त्यानंतर विठ्ठल मुंढे बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे घरत यांनी खारघर पोलिसांकडे याबाबत लेखी तक्रार दाखल करुन बोगस डॉक्टर विठ्ठल मुंडेवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी बोगस डॉक्टर मुंडे याची माहिती रायगड जिल्ह्याचे अलिबाग येथील आरोग्य अधिकार्यांना याबाबतची माहिती देऊन मुंडे विरोधात गत एप्रिल महिन्यात कलम ४१६, ४१७, ४१९ आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मुंडेचा शोध घेतला असता, त्याने आपल्या मुळ गावामध्ये परळीमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खारघरचे पोलीस उपनिरीक्षक एस.एन.नाईक, पोलीस हवालदार जाधव आणि पाटील यांच्या पथकाने परळी येथे जाऊन मुंडेला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी परळी येथे राहणार्या त्याच्या चुलत भावाच्या घरातून ईसीजी मशिन, ऍलोपथिक औषधांचा आणि सलाईन्सचा साठा तसेच बोगस वैद्यकीय शिक्षण प्रमाणपत्रे तसेच पेशंटची नावे आणि फोन नंबर असलेली डायरी जप्त केली. न्यायालयाने मुंडेला सुरुवातीला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नाईक यांनी दिली. सध्या तो तळोजा येथील कारागृहात असल्याचेही नाईक यांनी सांगितले.