नागपूर : विदर्भासाठी तेलंगणासारखे आंदोलन व्हावे, अशी आमची अपेक्षा नाही. माणसे मारून आम्हाला विदर्भ नको आहे. त्यामुळे दुसरा पर्याय हा बॅलेटचा आहे. राजकीय पक्षांपुढे दबाव निर्माण करण्यासाठी विदर्भाच्या नावाने राजकीय शक्ती निर्माण करून, येणा-या निवडणुकीच्या माध्यमातून ती दाखवून देणे गरजेचे आहे. सत्तेला गवसणी घालण्याइतकी राजकीय शक्ती निर्माण केल्याशिवाय विदर्भ राज्य मिळू शकणार नाही, असे मत ज्येष्ठ विदर्भवादी नेते व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.
लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे त्यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची दशा आणि दिशा’ या विषयावर सोमवारी चर्चासत्राचे आयोजन टिळक पत्रकार भवन सभागृहात करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन अॅड. श्रीहरी अणे यांनी केले. यात त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, विदर्भाचे आंदोलन हे जनआंदोलन नसल्याचे सत्ताधारी म्हणतात. सत्ताधारी या आंदोलनाला हिंसक करण्यासाठी डिवचत आहे. हिंसा करणे सोपी आहे. मात्र त्यातून निर्माण होणारा ब्रह्मराक्षस नियंत्रण करणे कठीण होईल. त्यामुळे विदर्भासाठी विश्वसनीय दबाव निर्माण करणारी चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. विदर्भासाठी मोठमोठ्या चळवळी झाल्या आहेत. जांबुवंतरावांनी उभ्या केलेल्या आंदोलनामुळे सत्तेलाही गवसनी घातली होती. तेव्हा विदर्भ राज्याची निर्मितीही होऊ शकली असती. परंतु ती चळवळ थांबविण्यात आली, पुढे ती संपलीही. अणे म्हणाले की, नीतेश राणे सांगतात विदर्भाच्या नावावर एकही जागा निवडून आणू शकत नाही. त्यांचे म्हणणे अतिशय योग्य आहे. विदर्भाच्या नावावर जोपर्यंत राजकीय शक्ती निर्माण होणार नाही तोपर्यंत विदर्भ मिळणार नाही.