* कोपरखैराणेमध्ये घडली घटना
* बालाजी थिएटरच्या पार्किगमध्ये केला जेरबंद
* ३१ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी
नवी मुंबई : रस्त्याने पायी चालत जाणार्या विवाहितेवर हल्ला करुन तिच्या गळ्यातील ५२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पळण्याच्या बेतात असलेल्या लुटारुला पोलिसांनी पाठलाग करुन पकडल्याची घटना
कोपरखैरणेमध्ये घडली. संतोष सुभाष मोहिते (३०) असे या लुटारुचे नाव असून कोपरखैरणे पोलिसांनी त्याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल
करुन त्याला अटक केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार उज्वला भिलारे (३२) नामक विवाहिता कोपरखैरणे, सेक्टर- ५ मध्ये रहाण्यास असून २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ती कोपरखैरणे, सेक्टर-८ भागात राहणार्या नातेवाईकांच्या घरी पायी चालत जात होती. यावेळी सेक्टर-८ भागात मोटारसायकलवरुन आलेल्या
हेल्मेटधारी संतोष मोहिते याने उज्वला भिलारे हिच्यावर हल्ला करुन तिच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे ५२ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून बालाजी थिएटरच्या दिशेने पलायन केले. अचानक घडलेल्या सदर प्रकारामुळे उज्वला भिलारे हिने आरडाओरड केल्यानंतर सदर भागात गस्तीवर असलेल्या कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस मार्कड आणि पाटील यांनी तत्काळ उज्वाल भिलारे यांच्याकडे धाव घेऊन त्यांची विचारपुस केली. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या लुटारुने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचुन पलायन केल्याचे समजल्यानंतर गस्तीवर सदर पोलिसांनी तत्काळ घटनेची माहिती पोलीस ठाण्यामध्ये देऊन लुटारु पळून गेलेल्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यातील पीटर मोबाईलच्या माध्यमातून देखील पोलिसांनी बालाजी थिएटरच्या दिशेने लुटारुचा माग काढण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे समजल्यानंतर आरोपी संतोष मोहिते याने बालाजी थिएटरच्या पार्कींग आवारात घुसून तेथे लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांनी लुटारु बालाजी थिएटरच्या पार्कींगमध्ये गेल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ थिएटरच्या पार्कींगमध्ये जाऊन संतोषला पकडले. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ सोन्याचे मंगळसूत्र सापडले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करुन त्याने ज्या मोटारसायलवरुन सदरचा गुन्हा दाखल केला, ती मोटारसायकल जप्त केली. सदर प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी संतोष मोहिते दिघा भागात राहण्यास असून त्याच्याकडील मोटारसायकल दुसर्याची असल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. न्यायालयाने संतोष मोहिते याला येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.