नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणा-या नवी मुंबई महापौर सार्वजनिकश्रीगणेश दर्शन स्पर्धा 2015 चा पारितोषिक वितरण सोहळा या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 30 ऑगस्ट रोजी सायं. 4.30 वा. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
याप्रसंगी याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा. राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य आ.सौ. मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. संदीप नाईक, विधान परिषद सदस्य आ. नरेंद्र पाटील आदी मान्यवर मुख्य अतिथी म्हणून तसेच उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, सभागृह नेता जयवंत सुतार, विरोधीपक्ष नेता विजय चौगुले, परिवहन समिती सभापती श्री. मोहन म्हात्रे हे प्रमुख अतिथी म्हणून आणि सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
श्रीगणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहित करण्यासाठी व उत्सव आयोजनामधून सामाजिक एकात्मतेची भावना वाढीस लागावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. यावर्षीही 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर2016 या कालावधीत संपन्न होणा-या श्रीगणेशोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून संस्था / मंडळांनी ज्या महानगरपालिका विभाग कार्यालय हद्दीत उत्सव साजरा होत आहे त्या विभाग कार्यालयात उपलब्ध असलेले श्रीगणेशदर्शन स्पर्धेचे प्रवेशअर्ज तेथेच दाखल करावयाचे आहेत.
विविध क्षेत्रातील त्रयस्थ मान्यवर व्यक्तींकडून स्पर्धा परीक्षण करण्यात येत असून परीक्षण करताना सजावट / देखाव्यातील कलात्मकता, त्यामधील समाजप्रबोधनात्मक / जनजागृतीपर संदेशाची मांडणी, परिसर स्वच्छता व टापटीप, शिस्तबध्दता, निधी विनियोगाची पध्दती, उत्सवात सादर होणारे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, रोषणाई – सजावट व इतर बाबींमध्ये जाणवणारे वेगळेपण अशा विविध गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. स्पर्धा परीक्षण करताना कलात्मकतेसोबतच उत्सव सादरीकरणाच्या उद्देशाचेही प्रामुख्याने विचार करण्यात येईल.
वरील निकषांच्या अनुषंगाने परीक्षण करुन स्पर्धेकरीता संपूर्ण महापालिका क्षेत्रातून सर्वोत्कृष्ट 5 गणेशोत्सव मंडळे निवडण्यात येणार असून त्यासोबतच आकर्षक देखावा, समाजप्रबोधनात्मक विषयानुरुप सजावट, उत्कृष्ट मुर्ती, स्वच्छता व शिस्तबध्दता अशा विभागांतर्गत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना स्वतंत्र पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी दि. 30 ऑगस्ट रोजी सायं. 4.30 वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा 2015 च्या पारितोषिक वितरण समारंभासाठी पदाधिकारी व सदस्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच नजिकच्या विभाग कार्यालयात यावर्षीच्या गणेशदर्शन स्पर्धेचे प्रवेशअर्ज भरुन स्पर्धा सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती लिलाधर नाईक व उपसभापती सौ. श्रध्दा गवस यांनी केले आहे.