रवींद्र सावंत यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : शहरातील विविध ठिकाणी गर्दुले उघडपणे नशापाणी करत असतात. गर्दुल्यांकडून महिला अत्याचाराची घटना घडण्याची शक्यता लक्षात घेवून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील गर्दुल्यांची बंदोबस्त करण्याची मागणी कॉंग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
काही दिवसापूर्वीच मुंबईतील विक्रोळी परिसरामध्ये गर्दुल्यांकडून एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना घडलेली आहे. अल्पवयीन मुलींवर, महिलांवर होत असलेले अत्याचार, विनयभंग, अतिप्रसंग या घटना मानवतेला काळीमा फासणार्या असून पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणार्या या घटना आहेत. नवी मुंबईतही रेल्वे रूळ, उद्याने, क्रिडांगणे तसेच अन्यत्र निर्मनुष्य ठिकाणी गर्दुल्याचे प्रमाण लक्षणीय असल्याची बातमी एका आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात गर्दुल्यांकडून महिला अत्याचाराच्या घटना कोठेही घडू नयेत यासाठी नवी मुंबई पोलिसांनी गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
गर्दुल्यांना नशापानी केल्यावर समाजव्यवस्थेचे भान राहत नाही. परंतु त्यांनी केलेल्या नशेमध्ये कोणत्या मुलीचे, महिलेेचे आयुष्य उध्दवस्त होवून कोणाचेही कुटूंब उध्दवस्त होवू नये याकरता आपण समस्येचे गांभीर्य लक्षात घ्यावे. नवी मुंबईतील गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याकरता विशेष ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू करावे. पेट्रोलिंगच्या माध्यमातून उद्याने, क्रिडांगणे, रेल्वे रूळालगतचा परिसर, नाले. खाडीकिनारे अथवा निर्मनुष्य ठिकाणांची झाडाझडती घेवून गर्दुल्यांचा बंदोबस्त करावा, असे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.