- मुंबई : आगामी महापालिकेच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी कमी अवधी असल्याने सण-उत्सव राजकीय पक्षांसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहे. त्यामुळे गल्लोगल्ली सार्वजनिक मंडळांची मंडप विनापरवानगी थाटली जात असताना नगरसेवक मौनीबाबा बनले आहेत. प्रत्यक्षात १२ हजाराच्या आसपास मंडळं असताना पालिकेकडे मात्र २० टक्केच मंडळांची अर्ज आली आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी मुंबईतील बहुतेक रस्त्यांवर मंडपं सजली आहेत़ सजावटीसाठी वेळ मिळावा याकरिता काही मंडळांनी पंधरवड्याआधीच गणेश मूर्ती मंडपात आणली आहे़ मात्र अद्यापही ११३८ सार्वजनिक मंडळं मंडपाच्या प्रतीक्षेत आहेत़ पोलिस आणि पालिकेच्या माध्यमातून हिरवा कंदिल मिळत नसल्याने अनेक मंडळं परवानाविनाच उत्सवाच्या तयारीला लागले आहेत़
मुंबईत दरवर्षी सुमारे १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आपले मंडप थाटतात़ तंंबूसाठी या मंडळांनी खोदलेले रस्ते भरण्यात येत नाहीत़ तर अनेक ठिकाणी रस्ताच अडविला जातो़ यामुळे वाहतूक, पादचारी यांची गैरसोय होत असते़ या मंडळांना दंड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही़ त्यामुळेच मोठी सार्वजनिक मंडळं पालिकेच्या कारवार्इंना जुमानत नाही़.
म्हणूनच यावर्षी परवानगी प्रक्रिया कठोर करण्यात आली आहे़ त्यामुळे गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस उरले असूनही केवळ ४८० गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे़ उर्वरित १३१८ मंडळं पालिका आणि पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत़ आतापर्यंत पालिकेकडे आलेल्या २१७६ अर्जांपैकी ३७८ मंडळांनाच पालिकेची अधिकृत परवानगी मिळाली आहे.
**** पोलिसांची परवानगी आवश्यक
पूर्वी सुमारे दहा ते १२ हजार मंडळांना सरसकट मंडप बांधण्याची परवानगी मिळत होती़ मात्र गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने पादचारी व वाहतुकीला अडथळा येत असलेल्या मंडळांना परवानगी नाकारण्याचे आदेश दिले आहेत़ वाहतूक व स्थानिक पोलिसांची परवानगी मिळाल्यानंरच पालिकेच्या वॉर्डातून मंजुरी मिळते़ म्हणून वाहतूक पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत सुमारे ११५० मंउळं खोळंबली आहेत़
** अर्ज केलेले मंडळ २१७६
** परवानगी दिलेले ४८०
** परवानगी नाकारली ३७८
** पोलिसांकडे प्रलंबित अर्ज ११५०
** पालिकेकडे प्रलंबित अर्ज १६८
** एकूण प्रलंबित १३१८