* से.१७, वाशीचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरले नवी मुंबईत सर्वोत्तम
नवी मुंबई : नवी मुंबई शहराची स्वत:ची वेगळी अशी ओळख आहे. अनेक गोष्टीत आपले वेगळेपण जपणार्या नवी मुंबईत साजर्या होणार्या उत्सवातही वेगळेपण जपले जाते. अशा चांगल्या पध्दतीने उत्सव साजरे करणार्या मंडळांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका श्रीगणेशदर्शन स्पर्धा आयोजित करून मंडळांना प्रोत्साहन देत असते अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी यापुढील काळात ‘एक गाव – एक गणपती’ सारखी ‘एक नोड – एक गणपती’, ‘एक विभाग – एक गणपती’ अशी अधिक एकोपा वाढविणारी संकल्पना राबविली जायला हवी असे मत मांडले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या ‘नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्री गणेशदर्शन स्पर्धा २०१५’ च्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांचे समवेत व्यासपीठावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर अविनाश लाड, सभागृह नेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती लिलाधर नाईक व उपसभापती सौ. श्रध्दा गवस, आरोग्य समिती सभापती सलुजा सुतार, महिला व बालकल्याण समिती सभापती सायली शिंदे, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती रमेश डोळे, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, विद्यार्थी व युवक कल्याण समिती श्रीम. सीमा गायकवाड, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती तनुजा मढवी आणि इतर महापालिका नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
से.१७, वाशी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने संपूर्ण नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचा रू. २५ हजार आणि स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असा बहुमान संपादन केला. सानपाडा से. १४ येथील नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ हे व्दितीय क्रमांकाचे तसेच से.१४, वाशी, महात्मा गांधी कॉम्प्लेक्स येथील महाराष्ट्र मित्र मंडळ हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. श्री दत्तगुरू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दत्तगुरूनगर, से.१५, वाशी यांनी चतुर्थ क्रमांकाचे तसेच एक गाव एक गणपती ही परंपरा पिढ्यान्पिढ्या जपणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आग्रोळीगाव, बेलापूर यांनी पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक स्विकारले.
याशिवाय सर्वोत्कृष्ट देखावा, समाजप्रबोधनात्मक विषयानुरूप सजावट, आकर्षक मुर्ती, स्वच्छता व शिस्तबध्दता या चार विभागांतर्गत प्रत्येक विभागामध्ये पाच पारितोषिके रोख रक्कमेसह स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र स्वरूपात वितरीत करण्यात आली (संपूर्ण निकाल सोबत जोडला आहे). याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ७७ गणेशोत्सव मंडळांना सहभाग प्रशस्तिपत्रे व स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली.
स्पर्धा परीक्षण करणारे नाट्यकर्मी श्री. अरूण शेलार, नेपथ्य व प्रकाशयोजनाकार श्री. दिलीप मडकईकर, पत्रकार-संपादक श्री. दिपक सोनावणे यांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. लिलाधर नाईक यांनी प्रास्ताविकपर मनोगतात मंडळांना प्रोत्साहित करण्यासाठी १९९६ पासून सातत्याने राबविला जाणारा हा उपक्रम मंडळांच्या उत्साही सहभागामुळे यशस्वी होतो असे सांगत यावर्षीही नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयात उपलब्ध असलेले प्रवेशअर्ज भरून मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी असे आवाहन केले.