नवी मुंबई : नवी मुंबईतील गोरगरीब करदात्यांकडून वारंवार होणार्या मागणीची दखल घेत महापालिकेच्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये आता सकाळसह सायंकाळी देखील रुग्णालयीन सेवा (ओपीडी) सुरू करण्यात आली आहे. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सदर सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
गेल्या २ वर्षापासून बांधून ओस पडलेल्या नेरूळ आणि ऐरोली हॉस्पिटलमध्ये महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत ओपीडी सेवा सुरु करण्यात आली खरी; पण डॉक्टर आणि कर्मचार्यांअभावी पूर्ण क्षमतेने सर्व आजारांवरील उपचारांसाठी आरोग्य सेवा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यमान महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर प्रकाराची गंभीर दखल घेत रुग्णालय संदर्भातील सर्व साहित्य उपलब्ध करणे आणि कर्मचारी भरतीचे काम गतीने सुरू केले आहे. यामध्ये डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचार्यांची नियुक्ती करून नेरूळ रुग्णालयात आस्थव्यंग, नाक, कान, घसा, दंत चिकित्सेसाठी ओपीडी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. ऐरोली रुग्णालयात मानसोपचार, आस्थव्यंग, नाक, कान, घसा, रक्त संक्रमण, दंत चिकित्सा, फिजिओ थेरपि आणि त्वचा रोग यासाठी ओपीडी सेवा मागील महिन्यापासून सुरू करण्यात आल्या आहेत.
सदर आरोग्य सेवांमुळे सामान्य नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील गोरबगरीब वर्ग विशेषत: झोपडपट्टीतील सर्वसामान्यांची सर्दी, ताप, खोकला या साधारण आजारांवर सुद्धा खर्च करण्याची कुवत नसल्याने ते महापालिकेच्या हॉस्पिटलवरच अवलंबून असतात. खाजगी दवाखान्यात गेल्यास किमान ५० ते ७० रुपयांपासून डॉक्टरांची फी सुरू होते. शिवाय डॉक्टर बाहेरील औषधे किमान १०० ते २०० रुपयांची लिहून देतात. विशेष म्हणजे महापालिका रुग्णालयात केवळ सकाळच्या वेळी ओपीडी असल्याने सायंकाळच्या वेळेस आजारी पडल्यानंतर खाजगी दवाखान्यात गेल्यावर सर्वसामान्य गरीब रुग्णांची खाजगी डॉक्टरांकडून लुबाडणूक होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सदर घटकाकडून सायंकाळी देखील महापालिकेने ओपीडी सेवा देण्याची मागणी केली जात होती. मात्र, त्याची यापूर्वीच्या एकाही महापालिका आयुक्तांनी फारशी दखल घेतली नव्हती. पण, विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांना सदरचा प्रकार समजताच त्यांनी याची त्वरित दखल घेत महापालिकेच्या नेरूळ, वाशी, ऐरोली येथील रुग्णालयात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ओपीडी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या सेवेची अंमलबजावणीही सुरू झाली असून त्यास नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.