** कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचा आरोप
मुंबई : मुंबईतील मनोरंजन मैदाने (आरजी) आणि खेळाची मैदाने (पीजी) ही दत्तक तत्त्वावर देण्याच्या धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर महापालिकेने ही भूखंड ताब्यात घेण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत. मात्र २१६ भूखंडापैकी ९० भूखंड हे शिवसेना व भाजपच्या नेत्यांच्या संस्थांच्या ताब्यात असून, त्यांना महापालिकेकडून अद्यापि नोटीसा बजावण्यात आल्या नाहीत. मात्र त्यांना अभय देण्यासाठी पून्हा ११ महिन्याच्या कालावधीत दत्तक तत्वावर पालिका धोरण आखत आहे.त्या धोरणास कॉंग्रेसचा तीव्र विरोध आहे असे निरूपम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्व मोकळे भूखंड ताब्यात घेऊन पालिकेने त्यांचा विकास करावा अशीही मागणी निरूपम यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली.
मुंबईतील मोकळया जागा खासगी संस्थांना विकसीत करण्यासाठी दत्तक व काळजीवाहू तत्वावर देण्यासाठी महापालिकेने धोरण आखले होते. त्यानुसार ९ मोकळया जागा काळजीवाहू तत्वावर दिल्या आहेत. तर २१६ उद्याने, मनोरंजन मैदाने दत्तक तत्वावर विशिष्ठ कालावधीसाठी खासगी संस्थांना देण्यात आल्या आहेत. मात्र त्या नियमित करण्यासाठी महापालिकेने पून्हा नवीन धोरण आखले होते. त्या धोरणाला मुख्यमंत्रयांनी स्थगिती दिली आहे. ही सर्व भूखंडे परत घेण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यानुसारच पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. मात्र ९० भूखंडांना अजूनही नोटीसा बजावल्या नसल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष निरूपम, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, माहिती कार्यकर्ते शैलेश गांधी, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया, आनंदी ठाकूर, मीरा कामत यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. शिवसेना भाजप नेत्यांच्या संस्थांच्या ताब्यात ९० भूखंड असल्याने राजकीय दबावापोटीच महापालिकेकडून अजूनही त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या नसल्याचे निरूपम यांनी सांगितले. यासंदर्भात आयुक्तांना विचारणा केल्यानंतर त्यांनी नोटीसा देण्यात येतील, मात्र कधी देण्यात येतील याबाबत कोणतेच स्पष्टीकरण दिले नसल्याचेही निरूपम यांनी सांगितले.
—————————-
मातोश्रीची जमिन मिळवल्यास सलाम ठोकू
महापालिका आयुक्तांनी राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या ९० भूखंडांना नोटीसा देण्याचे धाडस दाखवावे. ज्यावेळी ते मातोश्रीची जमीन परत मिळवतील त्यावेळी आपण स्वत:हून येऊन आयुक्तांना सलाम ठोकू असे आवाहनही अंजली दमानिया यांनी दिले.
————
यापुढे क्लब हाऊस नाही
आरजी- पीजीचे भूखंड देताना आता केवळ १५ टक्के बांधकामास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे यापुढे या भूखंडांवर कोणतेही बांधकाम होणार नाही. तसेच क्लब हाऊसचे बांधकाम करता येणार नाही असे महापालिका आयुक्तांनी आश्वासन दिल्याचे पालिका विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांनी सांगितले .
साभार : दै . जनशक्ति – मुंबई आवृत्ती