श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात रोजंदारीवर कंत्राटी स्वरूपात काम करणार्या कामगारांना प्रशासनामध्ये कायम तत्वावर सेवेत रूजू करून घेण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या परिवहन उपक्रमामध्ये (एन.एम.एम.टी) गेल्या काही वर्षापासून चालक आणि वाहक रोजदांरीवर कंत्राटी स्वरूपात अवघ्या 400 रूपये प्रतिदिन वेतनावर काम करत आहेत. संबंधित चालक-वाहक दररोज कामावर येतात. डेपोमध्ये बसतात. त्यांना कामावर आल्यावर एक ते दीड तासाने त्यांना आज काम आहे अथवा नाही ते समजते. हा प्रकार नवी मुंबई महापालिका प्रशासनाला शोभनीय नाही. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील प्रवासी उत्पन्नाचा अधिकांश हिस्सा मुंबई महापालिकेची बेस्ट घेवून जात आहे. सायन-पनवेल हायवेवर एसटी बसेस वाशी ते बेलापुर, दिघा ते बेलापुरदरम्यान प्रवासी उत्पन्न मिळवित आहे. खासगी रिक्षा व टॅक्सीदेखील आपल्या प्रवासी उत्पन्नाच्या स्पर्धेत आहेत. अशा वेळी एनएमएमटीची सर्वच वाहने दुरूस्त ठेवून वेळेवर प्रवासी सेवा देणे अगत्याचे आहे. खाडीपलिकडून येणार्या बेस्टच्या बसेस वेळेवर येवून दर्जेदार सुविधा पुरवित आहेत. मग आपणास नवी मुंबईतल्या नवी मुंबईत सुस्थितीत असणार्या बसेसमधून दर्जेदार प्रवासी देणे सोयिस्कर असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका परिवहन उपक्रमाने कंत्राटी पध्दतीने रोजदांरीवर काम करणार्या चालक-वाहकांना विनाविलंब कायम तत्वावर सेवेमध्ये रूजू करून घेणे आवश्यक आहे. संबंधित चालक-वाहकांना आपल्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. एनएमएमटीचे कामकाज, वाहन हाताळणी, बसेस, रस्ते या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आपणास चालक-वाहकांची गरज असल्याने प्रत्यक्ष काम करणार्या या चालक-वाहकांना कायम तत्वावर सेवेत रूजू करून घेण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.
180 दिवस रोजंदारीवर काम केल्यावर कामगारांना ठोक वेतनावर प्रशासनात समाविष्ठ करून घेण्यात येते. तथापि 12 ते 15 महिने या चालक-वाहकांनी रोजंदारीवर काम करूनही प्रशासनाने त्यांना ठोक वेतनावर समाविष्ठ करून घेतलेले नाही. 10 वर्षे झाली तरी अनेक चालक-वाहक आजही ठोक मानधनावरच काम करत आहेत. खासगी टूरिस्ट वाहनावर 800 ते 1000 रूपये चालकाला मिळतात. रोजंदारीवर तसेच ठोक मानधनावर घर चालत नसल्याने चालकांना नाईलाजास्तव कामावर दांडी मारून खासगी वाहनांवर जावे लागते. त्यामुळे एनएमएमटीची वाहने उभी राहील्यास प्रशासनाचेच आर्थिक नुकसान होते. या कामगारांना नोकरीची हमी नाही. पालिका प्रशासनाकडून कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळे या सर्व बाबींचा सर्वकष प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे. मध्यंतरी प्रशासनाने खासगी एजंन्सीलाही काही गाड्या चालविण्याचे कंत्राट दिले होते. तोही प्रयोग अयशस्वी झाला. आपण सातत्याने कामगारहितैषी भूमिका घेल्याने परिवहन विभागातील संबंधित कामगार आपणाबाबत खूप आशावाद बाळगून असल्याचे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या बेस्ट व एसटीमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. आपल्या परिवहन उपक्रमातील रोजदांरीवर कंत्राटी स्वरूपात काम करणारे हे संबंधित चालक-वाहक अन्यत्र सेवेत रूजू झाल्यास पुन्हा आपणास नवख्या व बिनअनुभवी चालक-वाहकांच्या हाती परिवहनच्या बसेस सोपवाव्या लागतील. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून तसेच प्रवासी सेवेतील सेवेचा विचार करता आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला या चालक-वाहकांची सेवा कायम तत्वावर करून घेण्याचे निर्देश द्यावेत,अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.