मुंबई : – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय झाले आहेत. मुंबई मेट्रो मार्ग 2 ब , मुंबई मेट्रो मार्ग 4 या मार्गिकांना मान्यता देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2 ब साठी 10,986 कोटी, तर मुंबई मेट्रो मार्ग 4 साठी 14,549 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर नागपूरमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मानकानुसार आवश्यक 20 पदे निर्माण करण्याचीही मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत दिली आहे.
तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संख्येत 25 ने वाढ करून आता प्रत्येक शैक्षणिक वर्षात 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्यात संस्थात्मक लवाद धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय खालीलप्रमाणे
– राष्ट्रपतींकडून शौर्यपदक मिळालेल्या सामान्य नागरिकास देखील भारतीय सेनेतील जवानांप्रमाणे एकरकमी पुरस्कार व मासिक अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय.
– मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय.
– महापालिकेमार्फत भाडेतत्त्वावर असलेल्या अनुसूची डब्ल्यू मध्ये समाविष्ट भूभागाच्या मक्त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय.
– नागपूर येथील शासकीय भौतिकोपचार व व्यवसायोपचार महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मानकानुसार आवश्यक 20 पदे निर्माण करण्यास मान्यता.
– चंद्रपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्याबाबत चांदा ते बांदा ही योजना राबविण्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्याचा निर्णय.
– महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
– मुंबई मेट्रो मार्ग 2 ब (डी.एन. नगर-मंडाळे) आणि मुंबई मेट्रो मार्ग 4 (वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली) या मार्गिकांना मान्यता.
– अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संख्येत 25 ने वाढ करून आता प्रत्येक शैक्षणिक वर्षात 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय.