श्रीकांत पिंगळे
नवी मुंबईः ‘सिडको’ने ‘सर्वांसाठी घरे’ असे ब्रीद स्वीकारुन विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी किफायतशीर किंमतीमध्ये गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती केली आहे. ‘सिडको’तर्फे २०१४ मध्ये खारघर सेक्टर – ३६ मध्ये व्हॅलीशिल्प, खारघर सेक्टर-१५ मध्ये वास्तुविहार,सेलिब्रेशन आणि उलवे सेक्टर- १९ अ मध्ये उन्नती या गृहसंकुलांची निर्मिती करण्यात आली असून, या गृहसंकुलात शिल्लक असलेल्या सुमारे ३८० सदनिकांसाठी ‘सिडको’ने दसर्याच्या शुभ मूहर्तावर गृह विक्री योजना जाहिर केली आहे. या योजनेमुळे सिडको गृहप्रकल्पांत घर मिळविण्याची पुन्हा एक संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. या घरांची विक्री सोडतीद्वारे करण्यात येणार आहे.
‘सिडको’च्या व्हॅलीशिल्प गृह प्रकल्पामध्ये एमआयजी गटासाठी १०१ सदनिका शिल्लक असून, एका सदनिकेची किंमत अंदाजे ६९ ते ७८ लाख रुपयांपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. एचआयजी गटासाठी असलेल्या सदनिकेची किंमत अंदाजे १ कोटी ३५ लाख ते १ कोटी ४७ लाख रुपये इतके असून, या गटातील १११ सदनिका उपलब्ध आहेत. वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृह प्रकल्पामध्ये केएच १ ते केएच ४ मध्ये अनुक्रमे १५,१०,२५, ४४ सदनिका उपलब्ध असून, या सदनिकेची विक्री किंमत केएच-१ साठी १२ ते १३ लाख, केएच-२ साठी २१ ते २२ लाख, केएच-३ साठी ४० ते ४२ लाख आणि केएच-४ साठी ७४ ते ७८ लाख रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय उन्नती गृहप्रकल्पामध्ये यूएल-१ आणि यूएल-२ मध्ये अनुक्रमे ६० आणि १४ सदनिका असून, या सदनिकेची किंमत अंदाजे १३ ते २५ लाख रुपये दरम्यान आहे. केएच-१ आणि यूएल-१ या अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या सदनिकांसाठी २५ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या केएच-२, यूएल-२ सदनिकांसाठी ५० हजार रुपये, केएच-३ आणि केएच-४ सदनिकांसाठी अनुक्रम ७५ हजार रुपये आणि १ लाख रुपये, एमआयजी गटातीलसदनिकांसाठी ५ लाख रुपये आणि एचआयजी गटातील सदनिकांसाठी १० लाख रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे.
सदर गृहप्रकल्पांच्या अर्जांची विक्री १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत करण्यात येणार असून, १८ ऑक्टोबर ते २ डिसेंबर २०१६ या कालावधीत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. अर्ज पुस्तिका २०० रुपये (व्हॅटसहित) किंमतीमध्ये उपलब्ध असून, माहिती पुस्तिकांसह अर्ज शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन, रायगड भवन आणि महाराष्ट्रातील ‘टीजेएसबी सहकारी बँक’च्या सर्व शाखांमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
नागरिकांनी अर्ज विकत घेऊन विहित नमुन्यात संपूर्ण भरलेली माहिती, स्वत:चा फोटो, साक्षांकित अर्ज, आणि नोंदणी शुल्क ‘सिडको लिमिटेड’च्या नावे मुंबई अथवा नवी मुंबई येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर २ डिसेंबर २०१६ पूर्वी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळून ‘टीजेएसबी बँक’च्या कुठल्याही शाखेत सादर करावेत, कुरिअर किंवा पोस्टाने पाठविलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.