श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई ःसाथीच्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलताना दिसून येत नसून शहरात निर्माण झालेल्या डेंग्यू आणि मलेरियाच्या परिस्थितीला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक तथा माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी केला आहे.
नवी मुंबई शहरातील सर्व हॉस्पीटल्समधील गत तीन महिन्यातील रुग्णांची तपासणी केल्यास नवी मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातल्याचे स्पष्ट होईल, असे अशोक गावडे यांनी सांगितले. साथीच्या आजारावर माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी घणाघाती हल्ला चढवित मनपा आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवरच टांगली आहेत.
काही दिवसांपूर्वी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांना डेंग्युची लागण झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर यांना देखील आता डेंग्युची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असलेल्या ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात गेल्या महिन्याभरात ३५ हून अधिक डेंग्युचे रुग्ण उपचारार्थ दाखल झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.
नवी मुंबईतील खाजगी वसाहतीत तसेच सिडको कॉलनीत डास अळी नाशक फवारणी न करण्याच्या नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आडमुठी निर्णयामुळे, नवी मुंबई शहरात सध्या डेंग्यू-मलेरिया सारख्या जीवघेण्या आजाराच्या साथीने थैमान घातले आहे. सध्या महापालिकेच्या वाशी येथे एकमेव सार्वजनिक रुग्णालय सुरु असल्याने साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शहरातील सर्व खाजगी हॉस्पीटल्स आणि त्यातील अतिदक्षता विभाग डेंग्युच्या रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. डेग्युंच्या आजारावर उपचार घेण्यासाठी किमान लाख रुपये खर्च येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मुंबईतील जे.जे. रुग्णालय, के.ई.एम, वाडिया, सायन रुग्णालय तसेच ठाण्यात छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे.
दोन दिवसापूर्वीच तुर्भे येथील बोनसरी क्वॉरी येथील रहिवाशी १८ वर्षीय ओमकार रंगीलाल यादव याला डेंग्यूची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. एकीकडे साथीच्या आजाराने शहरात धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे डेंग्यू आणि मलेरियाने शहरात थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया आणि साथीच्या रोगांनी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिका प्रशासन मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे.