श्रीकांत पिंगळे
इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंतांचे महापौर, उपमहापौरांना साकडे
नवी मुंबई : तातडीच्या महासभेचे आयोजन करून महापालिका प्रशासनात काम करणार्या कायम कर्मचारी-अधिकारी, कंत्राटी कामगार, ठोक वेतनावरील कामगार, रोजंदारीवरील कामगार यांच्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेण्याची मागणी एका लेखी निवेदनातून इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापौर सुधाकर सोनवणे व उपमहापौर अविनाश लाड यांच्याकडे गुरूवारी केली आहे.
दिवाळी आता खर्या अर्थाने सुरू झालेली आहे. पण ज्या कामगारांच्या, अधिकार्यांच्या परिश्रमामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला राज्य व केंद्र पातळीवर पुरस्कारांचा सातत्याने वर्षाव होत आहे. त्या कामगारांच्या व अधिकार्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत अद्यापि महासभेत शिक्कामोर्तब झालेले नाही, ही नवी मुंबई शहरासाठी व नवी मुंबईकरांसाठी भूषणावह बाब नसल्याची नाराजी रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव मंजुर करण्यासाठी तातडीने आयोजित केलेल्या महासभेत संबंधित कामगारांच्या सानुग्रह अनुदानाच्या विषयाला मान्यता देवून त्यानंतर अविश्वास ठरावाची प्रक्रिया करणे सर्वपक्षीय नगरसेवकांना शक्य झाले असते. परंतु आयुक्तपदावरून मुंढे हटाव याच एकमेव निर्धाराने राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून नगरसेवक अविश्वास ठरावामध्ये सहभागी झाले. परंतु त्याचवेळी पामबीच मार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन करणार्या कामगारांचा व त्यांच्या सानुग्रह अनुदानाचा नगरसेवकांना विसर पडला, ही खेदाची बाब असून महापालिकेत काम करणार्या सर्वच स्तरावरील कर्मचारी आणि अधिकार्यांचे दुर्दैवंच म्हणावे लागेल असे सावंत यांनी म्हटले आहे.
स्थायी समितीमध्ये सानुग्रह अनुदानाचा विषय मंजुर झाला असून महासभेत त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. तुम्हा-आम्हा सर्वाच्या घरी दिवाळीची तयारी सुरू झाली असणार. पण महापालिका प्रशासनात काम करणार्या सर्वच स्थरावरील कर्मचारी आणि अधिकार्यांचे काय? वर्षभर नवी मुंबई शहराच्या विकासासाठी आणि नवी मुंबईकरांना सुविधा पुरविण्यासाठी कष्ट करणार्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांचीदेखील दिवाळी सुखात जावी याबाबत पालिका सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवक बांधिल नाहीत काय? महापालिकेत काम करणार्या संबंधित कर्मचारी व अधिकार्यांबाबत नगरसेवकांना किती आत्मियता आहे हे त्या दिवशी महासभेत दिसून आले. मुंढे हटावसाठी प्रतिष्ठा पणाला लावणार्या नगरसेवकांना पालिकेत काम करणार्या संबंधित कर्मचारी व अधिकार्यांच्या सानुग्रह अनुदानाविषयी कोणतेही सोयरसुतक, आत्मियता व बांधिलकी नाही काय? असा प्रश्न उपस्थित करत दिवाळीनिमित्त महापालिकेला सुट्टी असली तरी आपण तातडीने महासभेचे आयोजन करून सानुग्रह अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा. केवळ निर्णय न घेता दिवाळीतच संबंधित कामगार व अधिकार्यांच्या हातात सानुग्रह अनुदान जमा होईल यासाठी महापौर व उपमहापौरांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
चौकट
आपण एक स्वच्छ प्रतिमेचे महापौर आहात. कष्टकर्यांविषयी आपणास आत्मियता आहे. आपल्या अंगी सामाजिक बांधिलकीची आजही जाणिव असल्याने तातडीने आपण महासभेचे आयोजन करून सानुग्रह अनुदानाचा प्रश्न मागीर्र् लावून संबंधित कामगारांच्या व अधिकार्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण कसे होईल याला प्राधान्य द्याल, याची आम्हाला खात्री आहे.
श्री. रवींद्र सावंत
नवी मुंबई इंटक अध्यक्ष