श्रीकांत पिंगळे
मुंढेंना राजकारण्यांचा विरोध कायम
नवी मुंबई ः अविश्वास ठरावाच्या लढाईत नगरसेवकांच्या झुंडशाहीमुळे मुंढे पराभूत झाले असले तरी नवी मुंबईतील अधिकांश जनता आज आयुक्त तुकाराम मुंढेंच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. नवी मुंबईतील जनभावनेचा आदर करत तुकाराम मुंढेंना तुर्तास हटविण्यास राज्य शासनाने नकार दिला आहे. तथापि मुंढे प्रकरण नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रतिष्ठेचा विषय केल्याचे पहावयास मिळत आहे. राज्य शासनाने मुंढेंना आयुक्त पदावरून न हटविल्यास नवी मुंबईच्या महापौर पदाचाच राजीनामा देण्याचा इशारा महापौर सुधाकर सोनवणे यांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव महापालिका सभागृहाने मंजूर केलेला असताना राज्य शासनाने त्यांना तात्काळ बोलावून घेणे आवश्यक आहे. जर शासनाने त्यांना परत न बोलवता महापालिकेतच कायम ठेवले तर आपण महापौर पदाचा राजीनामा देणार आहे, असा इशारा ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना २७ ऑक्टोबर रोजी दिला.
महापालिकेतील नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास दाखवूनही राज्य शासन त्यांची पाठराखण करणार असेल तर आमचेच काही तरी चुकले आहे, असा त्याचा अर्थ निघणार आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्विकारून नवी मुंबई शहराचा प्रथम नागरीक आणि महापालिका सभागृहाचा प्रमुख या नात्याने आपण राजीनामा देणार आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातील नगरसेवक-नगरसेविकांनी लोकशाही मार्गाने विरोध केला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजुर झाल्यानंतर त्यांना राज्य शासनाने तातडीने परत बोलावणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला लोकशाही कळत नाही, लोकप्रतिनिधींमध्ये फक्त लुटारू दिसतात अशा व्यक्तीबरोबर काम करण्यात काहीएक अर्थ नाही, असे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले.