श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : सिडकोच्या निकृष्ठ बांधकामाच्या नमुन्यामध्ये वाशी-कोपरखैराणेतील इमारतींबरोबरच कांदा बटाटा मार्केटचाही समावेश आहे. मार्केट धोकादायक घोषित होवून १५ वर्षाचा कालावधी लोटला असताना या कालावधीत महापालिकेतील सत्ताधार्यांनी तसेच नवी मुंबईतील प्रस्थापितांनी मार्केटबाबत व मार्केटमधील जिवित घटकांच्या सुरक्षेबाबत ठोस काहीही केले नाही. उलटपक्षी निवडणूकांच्या प्रचारफेर्यांचा अपवाद वगळता नवी मुंबईतील प्रस्थापित कांदा बटाटा मार्केटकडे कधी फिरकले नसल्याचा संताप कांदा बटाटा मार्केटमधील घटकांकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या बेलापुरमधील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घटकांसाठी सातत्याने भरीव कार्य करण्याचा स्थानिक तसेच मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करत असतात. या प्रयत्नामुळेच कांदा बटाटा मार्केटच्या पुर्नबांधणीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचा आशावाद कांदा बटाटा मार्केटमधील घटकांकडून उघडपणे व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबईतील कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत तसेच इतर मार्केटप्रमाणे अतिरिक्त एफएसआय मिळावा याकरिता महाराष्ट्र राज्याचे सहकार-पणन मंत्री सुभाष देशमुख यांची ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील यांच्यासमवेत भेट घेतली. सदर बैठकीत कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीस ना. सुभास देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारांनी गाळ्यांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सादर करावा आणि त्यास त्वरित मान्य करण्याच्या अनुषंगाने शासन उचित कार्यवाही करेल, असे आश्वासन दिले.
कांदा-बटाटा मार्केट १९८१ मध्येे नवी मुंबईत स्थलांतरीत झाले. या मार्केटचे बांधकाम घाईगर्दीत केल्याने ते आता नित्कृष्ट बनले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने कांदा-बटाटा मार्केटचे बांधकाम सन २००३ साली धोकादायक म्हणून घोषित केले. त्यानंतर २००५ साली मुंबई उच्च न्यायालयानेही पुनर्बांधकामाचा आदेश दिलेला आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये शासनाच्या वतीने ४०० चौरस फुटांचा गाळा देण्यात आला होता. शासनाने पुनर्बांधणी करताना व्यापार्यांना १००० चौरस फुटांचा गाळा देण्याची मागणी कांदा-बटाटा आडत व्यापार्यांनी केली आहे. यासंदर्भात स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी देखील कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची मागणी व्यापार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्याअनुषंगाने आ. मंदाताई म्हात्रे यांनी शिष्टमंडळासमवेत सहकार-पणन मंत्री सुभाष देशमुख यांची २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी तुर्भे येथील २४३ गाळ्यांच्या पुनर्बांधणी करिता शासन कटिबद्ध असून ८०० चौरस फुट बांधकाम असलेले गाळे शासन स्व:खर्चाने बांधून देईल, असे ना. सुभाष देशमुख यांनी व्यापार्यांना दिले. त्यावर आम्हास १००० चौरस फुट बांधकाम असलेले गाळे दिल्यास तेथे कोल्ड स्टोरेजही उभारता येऊ शकेल, असे व्यापार्यांनी ना. देशमुख यांना सांगितले. त्यावर तसा प्रस्ताव आडत व्यापार्यांनी शासनाकडे दिल्यानंतर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन देशमुख यांनी आमदार म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळास दिले. सदर शिष्टमंडळात माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील, सचिव मनोज सवनिक, बाजार समिती सचिव शिवाजी पहिणकर, राजीव मणियार, चंद्रकांत रामाने, बाळासाहेब बोरकर तसेच कांदा-बटाटा आडत व्यापारी उपस्थित होते.
दरम्यान, आपण सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न, पोलिसांच्या घरांचे पुनर्वसन तसेच एपीएमसी कांदा-बटाटा व्यापार्यांच्या गाळ्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. कांदा बटाटा मार्केट मधील अंतर्गत रस्ते तसेच मार्केटची इमारत सर्व सोयीसुविधांयुक्त निर्माण व्हावी, यासाठी आपण आग्रही असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.