नवी मुंबई : बेधडक आणि लोकोपयोगी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांनी युती करत अखेर अविश्वास ठराव बहुमताने मंजूर केला. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सध्या सुरू आहे. ‘बदली होणार की नाही हे मला माहित नाही, पण कितीही वेळा बदली झाली तरी प्रामाणिकपणे काम करत राहणार,’अशी रोखठोक प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कायद्यानुसार काम करणे, लोकांच्या समस्यांवर काम करणे, शहर-नागरिकांना सुविधा पुरवणे, ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे माझी चूक असेल तर दाखवा, मी माझी कार्यपद्धती सुधारेन, असेही मुंढे म्हणाले आहेत. तसेच सन्मानाची वागणूक देत नाही, आकसबुद्धीने वागतो, हे माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र याच वेळी जनतेसाठी एक पाऊल मागे घेण्यासाठी काहीच अडचण नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
सध्या नवी मुंबईमध्ये फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांविरोधात मुंढे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यावरुनच त्यांना टार्गेट केले जात असल्याचे बोलले जात आहे. जे काही निर्णय घेतले आहेत ते सर्व नियमाला धरुन घेतले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांची अविश्वास ठराव मांडताना युती कशी झाली हे माहिती नाही, आणि हा प्रश्न राजकीय असल्याचेही मुंढे
म्हणाले आहेत.