श्रीकांत पिंगळे
* मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची मंत्रालयात नवी मुंबई मनसेने घेतली भेट
नवी मुंबई : नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सभागृहात मांडलेला अविश्वास ठराव समंत झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे नवी मुंबईकरांच्या नजरा खिळल्या आहेत. अधिकांश नवी मुंबईकरांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी आयुक्तपदी तुकाराम मुंढेंच हवेत. ही नवी मुंबईकरांची नस व मनातील भावना ओळखून नवी मुंबई मनसेच्या शिलेदारांनी बुधवारी थेट मंत्रालय गाठत मुंढेंच्या समर्थनार्थ राज्याच्या मुख्य सचिवांना नवी मुंबईतील सत्य परिस्थिती कथन करत मुंढेंनाच नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कायम ठेवण्याचे साकडे मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी घातले. मंगळवारी आयुक्तांच्या विरोधात राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस यांच्या अभद्र युतीने जो अविश्वास ठराव मंजूर केला होता, त्यास मनसेने कडाडून विरोध केला आहे. कर्तव्यदक्ष, कार्यक्षम व प्रामाणिक नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या मागे मनसे ठामपणे उभी असून कालच्या अविश्वास ठरावा विरोधात बुधवारी नवी मुंबई मनसेने मंत्रालयात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची भेट घेऊन त्यांना अविश्वास ठराव रद्दबातल करण्याची व आयुक्त तुकाराम मुंढे यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून द्यायची मागणी निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे तसेच शहर सचिव संदीप गलुगडे, रवींद्र वालावलकर, एड.कौस्तुभ मोरे, जनहित कक्षाचे चंद्रकांत महाडिक, रोजगार विभागाचे नितीन चव्हाण, आप्पासाहेब कोठूळे, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, श्रीकांत माने, सागर नाईकरे, भूषण बारवे उपस्थित होते.