गणेश इंगवले / नवी मुंबई
नवी मुंबईतील अधिकांश राजकारण्यांच्या डोळ्यात सलणारे आणि अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकाम करणार्यांच्या मनात धडकी भरविणारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आजही नवी मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत असल्याचे वाशी सेक्टर १७ येथे पहावयास मिळाले. येथे राबविण्यात आलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ अभियानामध्ये सर्वसामान्य नवी मुंबईकरांचे मुंढे यांच्यावरील प्रेम पुन्हा एकवार पहावयास मिळाले.कोणतेही शहर तेथील सुजाण आणि जबाबदार नागरिकांमुळेच उत्कृष्ट बनते, त्यामुळे आपले नवी मुंबई शहर चांगले असले तरी ते सर्वोत्तम बनवायचे आहे याकरीता नागरिकांचे संपूर्ण योगदान गरजेचे असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका आणि नागरिक यांच्या एकत्र योगदानातून नवी मुंबईचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.
से.17, वाशी येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे उद्यानात संपन्न झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाप्रसंगी नागरिकांशी सुसंवाद साधताना त्यांनी मुले, युवक, प्रौढांसह ज्येष्ठ नागरिकांना हे शहर निवासाकरीता सर्वोत्तम वाटावे यादृष्टीने सर्वांच्या सहयोगाने शहराचा सामाजिक, भौतिक व वाणिज्यदृष्ट्या आर्थिक विकास व्हावा हा प्रयत्न राहील ही भूमिका मांडली. मात्र यामध्ये नागरिकांचा सहयोग सर्वात महत्वाचा आहे हे स्पष्ट करीत वॉक विथ कमिशनर हा नागरिक सुसंवादी कार्यक्रम यादृष्टीनेच नागरिकांच्या तक्रारी, सूचना, संकल्पना जाणून घेण्यासाठी आयोजित केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित कामांसाठी कोणत्याही कार्यालयात जायला लागू नये याकरीता ई-गव्हर्नन्सवर भर देत कॅशलेस आणि फेसलेस ॲडमिनिस्ट्रेशन राबविण्याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट करीत नवी मुंबई महानगरपालिकेची बेबसाईट www.nmmc.gov.in अशी नव्या स्वरूपात अधिकृत व अत्याधुनिक केली असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी आपल्या तक्रारी, सूचना करण्यासाठी आता या वेबसाईटवरील ‘तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System)’ चा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. येथे केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात येतेच असे ठामपणे सांगत तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचे मूल्यांकनही नागरिक करू शकतात व कार्यवाहीबद्दल समाधान झाले नाही तर पुन्हा तक्रारही दाखल करू शकतात अशी माहिती त्यांनी दिली. ही संपूर्ण कार्यवाही ॲटोमॅटिक होत असल्याने व त्यावर आपले काटेकोर लक्ष असल्याने नागरिकांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा असे आयुक्तांनी सांगितले.
त्याचप्रमाणे ही तक्रार निवारण प्रणाली आता हातातल्या स्मार्ट फोनवरही “nmmc e-connect” या मोबाईल ॲपव्दारे सहज उपलब्ध असून नागरिक अगदी चालता चालता एका स्क्रीन टचवर छायाचित्रासह आपल्या तक्रारी दाखल करू शकतात, त्यामुळे नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करून याचा उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. शिवाय या ॲपव्दारे मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याची सुविधाही सहज उपलब्ध असून नागरिकांनी याही सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र सरकारने स्वच्छ सर्व्हेक्षण हाती घेतले असून “swachhata MoUD” हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून स्वच्छतेविषयीच्या आपल्या तक्रारी – सूचना छायाचित्रासह त्यावर पाठवाव्यात, जेणेकरून त्याचे12 तासात निवारण होईल व त्यावर केंद्र सरकारचेही लक्ष असेल अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत नागरिकांच्या अभिप्रायांना व शिफारशींनाही गुण आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने हे मोबाईल ॲप नवी मुंबई स्थान सिलेक्ट करून डाऊनलोड करून घ्यावे असे सूचित करतानाच 4 जानेवारीपासून स्वच्छ सर्व्हेक्षण सुरू होत असून केंद्रीय परीक्षण पथक देशातील 500 शहरांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत, तसेच त्याठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या नवी मुंबई शहराचे देशातील 500 शहरांमध्ये मानांकन उंचाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी केले.
चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिका पार पाडत असतानाच नागरिकांनीही छोट्या-छोट्या गोष्टींचे सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ओला व सुका कचरा घरातच वेगवेगळा करणे व कचरागाडीत देताना वेगवेगळा देणे, रस्त्यावर कुठेही कचरा न टाकणे, कुठेही न थुंकणे, सोसायटीच्या आवारातच वाहनांचे पार्कींग करणे, त्यादृष्टीने सोसायटीची सभा घेऊन जागा ठरविणे, रस्त्यावर अथवा कुठेही अगदी नो पार्कींग झोनमध्येही पार्कींग करण्याची सवय बदलणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, पाणी गरजेपुरतेच वापरणे, पाण्याचे योग्य मापन होण्यासाठी एएमआर मीटर बसविणे, सार्वजनिक शौचालयांचा-प्रसाधनगृहांचा वापर करणे, वृक्षारोपण करणे अशा अनेक बाबतीत नागरिकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून शहराची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
पाण्याचा योग्य वापर व्हावा यादृष्टीने लवकरच वापरानुसार पाण्याच्या दरांबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. एन.एम.एम.टी. बससेवेला अद्ययावत करीत स्मार्ट आयटीएस प्रणाली राबविली जात असल्याची माहिती देत nmmc e connect ॲपलाच संलग्न एन.एम.एम.टी. बससेवेचे ॲप कार्यान्वित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याव्दारे नागरिकांना कोणती बस कोठून सुटते यासह एखाद्या बसस्टॉपवर अपेक्षित बस किती वेळात पोहोचेल याचीही माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल असे सांगतानाच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रत्येक गोष्टीतून नागरिकांना सहज आणि सुलभ सेवा उपलब्धतेवर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले.
नागरिकांना भेटून त्यांचे म्हणणे जाणून घेणारे आपण लोकाभिमुख आयुक्त आहात असा जाहीर अभिप्राय देत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले.