गणेश इंगवले / नवी मुंबई
ऐरोली सेक्रट २० परिसरातील पाच मजली इमारतीवर आणि ऐरोली गावातील गांवदेवी मैदानाच्या बाजूलाच बांधकाम सुरु असलेल्या तीन मजली इमारतीवर महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या धडक कारवाईमुळे ऐरोली, घणसोली, तळवली, रबाळे येथील अनधिकृत बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामविरोधात अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक मोहिमा राबविल्या जात असून रस्ते, पदपथ, मार्जिनल स्पेस मधील अतिक्रमणे हटवून चालण्यासाठी व रहदारीसाठी जागा खुल्या केल्या जात आहेत. तसेच अनधिकृत बांधकामांविरुध्द निष्कासनाची कारवाई केली जात आहे.
अशाचप्रकारे ऐरोलीगांव सेक्टर २० येथील रोहीत दिगंबर जोशी यांनी महानगरपालिकेची बांधकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेल्या पाच मजली इमारतीवर अतिक्रमण विभागाने निष्कासनाची धडक कारवाई केली.
त्याचप्रमाणे धनाजी पाटील, सेक्टर २०, ऐरोलीगांव यांचे गांवदेवी मैदानाच्या बाजुला सुरु असलेल्या तीन मजली इमारतीच्या बांधकामास महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. त्या बांधकामावरही निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत तायडे आणि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्तात या अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात आली.