कोकण विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांना मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंचे निवेदन
श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : कोकण विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाची आचारसंहीता 5 जानेवारी पासून लागू होऊनसुद्धा नवी मुंबईतील पेट्रोल पंप परिसरातील नोटाबंदीच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या जाहिरातींचे होर्डिंग न काढल्याबद्दल मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी या संदर्भात कोकण विभागीय आयुक्त व ठाणे जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून निवडणूक आचारसंहीतेचा भंग करणार्या या जाहिराती तात्काळ काढाव्यात अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकताच कोकण विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे 5 जानेवारी पासूनच नवी मुंबईसहित ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आचारसंहिता लागू होऊन सुद्धा नोटबंदी निर्णयाच्या वित्त मंत्रालय, भारत सरकार तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या जाहिरातींचे फलक नवी मुंबई शहरातील सर्वच पेट्रोल पंप परिसरात झळकत आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडत असून मतदारांना आकर्षित करण्याचे हे एक माध्यम होत असल्याचे मत मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
हा आचारसंहितेचा भंग असून याची तात्काळ दखल घेऊन निवडणूक आचार संहिता नियमांची कडक अंमलबजावणी करून सदर जाहिरात फलक तात्काळ काढावेत अशी मागणी निवेदनाद्वारे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.