मुंबई – शिवसेनेशी युती न झाल्यास भाजपकडून पर्यायी रणनीती म्हणून मुंबईतील २२७ जागांसाठी ५१३ उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. ‘एबीपी माझा’च्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील २२७ वॉर्डांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी २५०० इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले होते. यापैकी ५१३ उमेदवारांची यादी निवडणूक समितीकडून अंतिम करण्यात आली आहे. आता ही यादी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या निवडणुक समितीत २९ सदस्यांचा समावेश होता. या समितीने सलग तीन दिवस २०तास मॅरेथॉन व सखोल चर्चा केली. काल रात्री तीन वाजता समितीची बैठक संपली. आता आशिष शेलार या ५१३ उमेदवारांमधून अंतिम उमेदवारांची निवड करतील व ही यादी मुख्यमंत्र्यांपुढे सादर करतील. भाजपच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे प्रत्येक वॉर्डात दोन ते तीन तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना-भाजप युतीसाठीच्या चर्चेच्या पहिल्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या बेताल वक्तव्याच्या मुद्द्यामुळे ही चर्चा फिस्कटली होती. शिवसेनेला सोमय्या व शेलार यांच्या वक्तव्यांवर आक्षेप असून भाजपला अनिल परब व खासदार संजय राऊत यांच्या टीकाटिप्पणीबद्दल राग आहे. भाजप नेत्यांच्या आरोपांच्या फैरी सुरु असेपर्यंत युतीची चर्चा सुरु न करण्याचा आणि नोटाबंदीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडत राहण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील चर्चेनंतरच तिढा सुटण्याची शक्यता आहे. मात्र, काहीवेळापूर्वीच दोन्ही पक्षांकडून चर्चेसाठी पुन्हा तयारी दर्शविण्यात आली आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर युतीची चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.