सुजित शिंदे : 8369924646 / 8082097775
पनवेल : देशातील दोन हजार शहरांमध्ये जागतिक दर्जाचे बस टर्मिनल उभारणीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहन, महामार्ग व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच नवी मुंबई येथे दिली.
एमजी समूह या खाजगी बसगाड्यांची निर्मिती करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने सिडको एक्सिबिशन सेंटरमधील प्रवास २०१७ च्या उदघाटनाप्रसंगी स्कॅनिया इंडियासोबत भागीदारी जाहीर केली. त्यावेळी झालेल्या ‘प्रवास २०१७’ या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल, राज्यस्थानचे मंत्री युनूस खान, स्वतंत्रदेव सिंह, प्रसन्ना पटवर्धन, आमदार मंदा म्हात्रे, एमजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कामत, स्कॅनिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मिकाईल बेंजे यांच्यासह विविध कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देशातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व अपघातांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्वाचे आहेत, त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरु करण्यात येणार असून त्याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचेही ना.गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
एमजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कामत म्हणाले कि, भारतीय बस उद्योगामध्ये नवीन रचना व उत्पादने देण्यात एमजी समूह आघाडीवर राहिला आहे. देशातील सर्वात मोठी बसबांधणी कंपनी होण्याचा आमचा दृष्टिकोन लक्षात घेता, स्कॅनिया या जगविख्यात वाहन कंपनीशी भागीदारी करणे हि आमच्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची बाब असून स्कॅनिया हा आता आमच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे, असेही कामत यावेळी म्हणाले.