सुजित शिंदे : 8369924646 / 8082097775
पनवेल : पनवेल बस स्थानक अद्यावत पद्धतीने पुनर्बांधणी करून मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांच्यासोबत मुंबर्इत त्यांच्या दालनात बुधवारी(दि.02 ऑगस्ट) एस.टी.परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रवासी संघाचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्य सचिवांना पनवेल बस स्थानक अद्यावत पद्धतीने पुनर्बांधणी करण्यासाठी मागणी करून सद्यस्थितीत स्थानकाची दुरावस्थेबाबतची सविस्तर वृत्तपत्राच्या कात्रणासह माहीती देण्यात आली.
यावेळी प्रधान सचिवांनी एस.टी.महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांना पनवेल बस स्थानकामधील खड्डे, चिखल, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, मुतारी आदी समस्यांबाबत प्रवाशांना होणार्या गैरसार्इबद्दलच्या अडचणी त्वरीत दूर करण्यासाठी तात्काळ आदेश दिले. तसेच अद्यावत बस स्थानक पुनर्बांधणी करून घेण्यासाठी योग्य घटकांचा सहभाग (प्प्प्) माध्यमातून अद्यावत पद्धतीने पनवेल एस.टी.स्थानकाची पुनर्बांधणी करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले. पनवेल बस स्थानकासंदर्भात गेल्या पाच वर्षापासून प्रवासी संघ पनवेल व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या अनुषंगाने पनवेल बसस्थानकाच्या विकासाचा मार्ग सुकर होणार आहे.
या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, महाव्यवस्थापक(स्थापत्य) राजेंद्र जपजाल, मुख्य स्थापत्य अभियंता प्रशांत पोतदार, प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तिकुमार दवे, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी के.जी.म्हात्रे, कार्यवाह व मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट उपस्थित होते.