स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : विविध आजारांवरील उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झालेली आहे, तरीही बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांच्या प्रकारात वाढ झाली असून कॅन्सरच्या प्रमाणातही काहीशी वाढ झालेली दिसते आहे. त्यामुळे एक जबाबदार आरोग्य यंत्रणा पुरविणारी संस्था म्हणून आपली जबाबदारी मोठी असून त्यादृष्टीने व्यापक जनजागृती करणे व आपल्या आरोग्य कर्मचा-यांच्या या विषयीच्या माहिती व ज्ञानात भर घालणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यादृष्टीने क्षमता बांधणी करण्यात येईल व सर्व आरोग्य कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या कॅन्सरबद्दल जनजागृती करून संवेदीकरण करतील आणि संशयीत रुग्णांची तपासणीही करण्यात येईल असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास व आरोग्य विभागाच्या वतीने तसेच इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या सहयोगाने महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आऱोग्य सेवक – सेविका यांच्या करीता आयोजित कॅन्सर तपासणी क्षमता बांधणी शिबीराप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीम. शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, समाजविकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी, इंडियन कॅन्सर सोसायटीचे संचालक डॉ. अमोल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. 03 व 04 ऑगस्ट तसेच दि. 08 ते 11 ऑगस्ट 2017 या कालावधीत कॅन्सर तपासणी क्षमता बांधणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कॅन्सरबाबत माहिती व उपचार विषयक या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. आज शिबीराच्या पहिल्या दिवशी इंडियन कॅन्सर सोसायटीचे संचालक तथा नामवंत व्याख्याते डॉ. अमोल वानखेडे यांनी उपस्थित वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी – कर्मचा-यांशी मुक्त संवाद साधला व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्या मनातील कॅन्सर विषयक शंकांचे समाधान केले.