संदीप खांडगेपाटील : 8369924646 / 8082097775
* रेल्वे स्थानक आवारातील सिडको सुरक्षा रक्षकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
* रेल्वे पोलिसही करतात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा
* रेल्वे स्टेशन आवारातील दुकान कमिटीचीही फेरीवाल्यांप्रती उदासिनता
नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर पश्चिम दिशेला पडल्यावर स्थानिक राजकारण्यांच्या राजाश्रयाने आणि आशिर्वादाने फेरीवाल्यांचे अतिक्रमण गेल्या काही वर्षात वाढीस लागले आहे. या फेरीवाल्यांची मजल आता रेल्वे स्थानक आवारातच व्यवसाय करण्याइतपत गेल्यामुळे सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आणि रेल्वे स्टेशन आवारात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. या स्टेशन आवारातील दुकानांची एक कमिटी असून ती कमिटीदेखील फेरीवाल्यांच्या या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत असल्याची नाराजी तेथील दुकानवाल्यांकडून व्यक्त केली जावू लागली आहे.
नेरूळ रेल्वे स्टेशनबाहेर पडल्यावर पश्चिमेच्या बाजूला फेरीवाल्यांचे अतिक्रमण हा गेल्या काही वर्षात बहूचर्चित विषय झाला आहे. या फेरीवाल्यांकडून काही वर्षापूर्वी एकाचा खून झालेला असतानाही पालिका प्रशासन या स्टेशनाबाहेरील परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत आहे. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांचा नेरूळवासियांना त्रास होत असताना फेरीवाल्यांच्या असणार्या राजकीय गॉडफादरकडे पाहून याविरोधात अन्य राजकारणीही कानाडोळा करत असल्याची कुजबुज नेरूळवासियांमध्ये सुरू आहे.
रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसरात अतिक्रमणाने बकालपणा आणणार्या फेरीवाल्यांचे धाडस आता वाढीला लागले असून रेल्वे स्थानक आवारातच पश्चिम बाजूने दोन्ही प्रवेशद्वारालगतच फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे. विशेष म्हणजे स्टेशन आवारात आत आणि स्टेशन आवारालगतच या फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असतानाही याविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सिडकोचा अतिक्रमण विभाग, सिडकोचे सुरक्षा रक्षक तसेच रेल्वे पोलिसही या फेरीवाल्यांकडे कानाडोळा करत असल्याने फेरीवाल्यांचे स्टेशन आवारात व्यवसायाचे कार्यक्षेत्र वाढीस लागले आहे. रेल्वे स्टेशन आवारातील दुकान चालकांची एक कमिटी आहे, ही कमिटीदेखील स्टेशन आवारातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर तोडगा काढण्यास कुचकामी ठरल्याची प्रतिक्रिया दुकानचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ऐन पावसाळ्यात गरजेपोटी बांधलेली ग्रामस्थांची घरे तोडण्यास पुढाकार घेणारा सिडकोचा अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला खतपाणी घालत असल्याची नाराजी रेल्वे प्रवाशांकडून उघडपणे व्यक्त करण्यात येत आहे.