स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्याची मागणी युवा सेनेचे बेलापुर विधानसभेतील उपविधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त व शिक्षणाधिकार्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात महापालिका प्रशासनाच्या शिक्षण मंडळाकडून महापालिका शाळा चालविल्या जात असून यामध्ये प्राथमिक तसेच माध्यमिकही शिक्षण देण्यात येत असल्याचे सांगून निखिल रतन मांडवे आपल्या निवेदनात पुढे म्हणाले की, महापालिका शाळेमध्ये अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील विशेषत: गोरगरीबांची मुले शिक्षण घेत आहेत. शाळेतील निकाल पाहता मुलांच्या गुणवत्तेकरिता शिक्षक घेत असलेल्या परिश्रमाची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे. भारत हा उष्ण कटीबंधात मोडणारा देश असल्याने मुलींना मासिक पाळीची प्रक्रिया अन्य देशांच्या तुलनेत लवकर सुरू होते. या पार्श्वभूमीवर लोकल्याणकारी भूमिकेतून विविध योजना राबविणार्या महापालिका प्रशासनाने महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणार्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविणे आवश्यक असल्याचे निखिल मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
शेजारीच असलेल्या मुंबई महापालिका प्रशासनाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या तब्बल 172 महापालिका शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने एक लोकोपयोगी निर्णय म्हणून महापालिका शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्याबाबत काय व कशा प्रकारे करण्यात आली आहे याची माहिती जाणून घ्यावी. शाळेतील मुलींची गैरसोय टाळण्यासाठी आपण या मागणीची सकारात्मक दखल घेवून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी निखिल रतन मांडवे यांनी केली आहे.