सुजित शिंदे : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचा रविवारी (6 जुलै) वाशीत युवा कार्यकर्ता मेळावा होत असून या मेळाव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या मेळाव्यात राजकीय क्षेत्रातील अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने कोणत्या पक्षाला किती खिंडार पडणार आहे, याचे उत्तर रविवारीच पहावयास मिळणार आहे.
वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये रविवारी सांयकाळी हा मेळावा होत असून या मेळाव्याला भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. योगेश टिळेकर आणि बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला भाजपचे प्रदेश चिटणिस व नवी मुंबईचे प्रभारी संजय उपाध्याय, पनवेलचे नगरसेवक विक्रांत पाटील, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपचे जिल्हा सरचिटणिस डॉ. राजेश पाटील आणि कृष्णा पाटील उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यामध्ये विविध पक्षातील युवा तसेच ज्येष्ठ मातब्बरांना भाजपमध्ये आणण्यासाठी भाजयुमोच्या पदाधिकार्यांनी नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसली असून मेळाव्याअगोदरच युवा सेनेच्या संजय पवारसारख्या अनेक घटकांनी आपल्या भाजपप्रवेशाचे बॅनर लावले आहेत. सध्या युवा सेनेला या मेळाव्यामुळे काही प्रमाणात खिंडार पडणार असल्याचे प्रवेशाच्या बॅनरवरून आताच स्पष्ट झाले आहे. युवा सेनेला याप्रकरणी उशिरा जाग आली असून बॅनर लागल्यावर संबंधित पदाधिकार्यांच्या हकालपट्टीची युवा सेनेने औपचारिकता पूर्ण केली आहे.
भाजयुमो कोणत्याही पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत नसून केंद्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेश पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक पातळीवर आमदार मंदाताई म्हात्रे करत असलेली लोकाभिमुख कार्य पाहून अन्य पक्षाचे पदाधिकारी स्वेच्छेने भाजपमध्ये दाखल होण्यास उत्सूक आहेत. रविवारच्या मेळाव्यात त्याची एक झलक पहावयास मिळणार असल्याची माहिती भाजयुमोचे नवी मुंबई सचिव गणेश पालवे यांनी दिली.
या मेळावा यशस्वी करण्यासाठी दत्ता घंगाळे यांच्यासह भाजयुमोचे नवी मुंबई सरचिटणिस हरिश पांडेय, संदीप करंडे, जगन्नाथ कोळी, गुलाब नाईक, गणेश पालवे, प्रदीप बुरकुल, विद्यार्थी आघाडीप्रमुख हरिष हलवाई, नवी मुंबई युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू, दिपिका बामणे, नितु सिंग यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.