** महापौर भाजपाचाच होणार, आ. नरेंद्र मेहता यांना विश्वास
** ९५ पैकी ३८ मराठी, तर ५७ अमराठी उमेदवार देत साधला समाजिक समतोल
मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ९५ पैकी ३८ जागांवर मराठी उमेदवारांना प्राधान्य देतानाच ५७ अमराठी उमेदवारांनाही उमेदवारी देत सर्व समाज घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्येच चार रिपाई उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान मीरा भाईंदर महापालिकेत स्वबळावर भाजपाचाच महापौर होणार असा विश्वास आ. नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेनेकडून युतीबाबत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भाजपाने रिपाई आठवले गटाला सोबत घेत स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचाही बिनशर्त पाठिंबा मिळवण्यात भाजपा नेतृत्वाला यश आल्याने दलित आणि बहुजन समाजाची एकगठ्ठा मते भाजपाच्या उमेदवारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत बोलताना मा. आ. नरेंद्र मेहता म्हणाले की, मीरा भाईंदर महापालिकेवर भाजपाचेच वर्चस्व राहणार असून महापौरही भाजपाचाच असेल. देशात, राज्यात आणि आता मीरा भाईंदर महापालिकेतही भाजपाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, याबद्दल आपल्याला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. केंद्रात आणि राज्यात आमच्या सोबत असलेल्या मित्र पक्षांना सत्तेतील योग्य वाटा देण्याचे आमच्या पक्षाचे धोरण राहिले आहे. त्याच धर्तीवर मीरा भाईंदर मध्येही सत्तेतील योग्य तो वाटा मित्र पक्षांना दिला जाईल, असेही ते म्हणाले.
****
सर्वच समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे भाजपाचे धोरण
दरम्यान उमेदवारी देताना भाजपाने सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचे धोरण असल्याचे भाष्य मा. आ. नरेंद्र मेहता यांनी केले होते. त्यानुसार उमेदवारी देताना महिला आणि युवा वर्गाला चांगले प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात बहुसंख्येने वास्तव्यास असलेला अमराठी मतदार लक्षात घेता, तब्बल ५७ अमराठी उमेदवारांनाही पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मुस्लीम समाजाला ५ ठिकाणी, आणि ख्रिश्चन समाजाला ४ जागांवर उमेदवारी देत सामाजिक समतोल साधला गेला आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या उमेदवारांमध्ये डॉक्टर्स, वकील अशा उच्चशिक्षितांसोबतच उद्योजक आणि युवकांचाही समावेश करण्यात आला आहे.