संदीप खांडगेपाटील : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : दारू पिवून वाहन चालवू नये याबाबत वाहतूक विभागाकडून वारंवार वाहन चालकांना मार्गदर्शन होत असताना नेरूळ पश्चिमेला दारू पिवून एका अल्टो कारच्या चालकांना वाहने उडविण्याचा पराक्रम केल्याने एक भीतीचा थरार नेरूळवासियांना शुक्रवारी (दि. 4 जुलै) रोजी जवळून पहावयास मिळाला. शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले हे घटनास्थळी उपलब्ध असल्याने त्यांनी तात्काळ संतप्त जमावाला शांत करत मद्यपि वाहनचालकाला नेरूळ पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्या मद्यपि वाहनचालकाला जमावाकडून बेदम मारहाण होण्याचा धोका टळला
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नेरूळ सेक्टर सहा परिसरात अपना बाजार समोरच एक भरधाव वेगात आलेल्या अल्टोने (क्रं :एमएच43/ एएफ3513) समोरील होंडा सिटी गाडीला (क्रं. एमएच43/एआर8999 )विरूध्द बाजूने जावून जोरदार धडक दिली. या अपघातात होंडा सिटीचे नुकसान झाले असून अल्टोचेही नुकसान झाले आहे. अपघात घडताच वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची व स्थानिक रहीवाशांची गर्दी झाली. अल्टो थांबवून स्थानिक रहीवाशांनी वाहन चालकाला व सोबतच्या प्रवाशाला बाहेर काढले असता वाहन चालक पूर्णपणे दारूच्या नशेत आढळून आला. गाडीच्या आतील भागात दारूच्या बाटल्याही पहावयास मिळाल्या. तितक्यात मागून आलेल्या काही रिक्षाचालकांनी या अल्टोचालकाने सेक्टर 12 येथे झुलेलाल मंदिरासमोरील रस्त्यावर एका रिक्षाला व अन्य दुचाकी वाहनांनाही धडक दिल्याचे सांगितले. एका शिवसैनिकाच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ही अल्टो डिव्हाडरवरही चढली असल्याचे सांगितले.
शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलविले आणि मद्यपि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. तोपर्यत जमावाकडून काही प्रमाणात मद्यपि वाहन चालकाची धुलाई झाली होती.
या अपघातामुळे झालेल्या आवाजामुळे सभोवतालच्या सोसायटीतील रहीवाशीही मोठ्या संख्येने जमले होते. मद्यपि तळीरामाने रिक्षा, दुचाकी वाहने, होंडा सिटीसह अन्य वाहनांना धडक दिल्याने दारूची नशा अन्य वाहनांची लाखो रूपयांची हानी करून गेल्याची चर्चा बराच वेळ प्रत्यक्षदर्शीमध्ये सुरू होती.