संदीप खांडगेपाटील : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिका प्रशासनाने अडीच वर्षापूर्वी बांधून तयार असलेली भाजी मंडई लवकरात लवकर सुरू करण्यासाठी परिसरातील सत्ताधार्यांसह विरोधकही कमालीचे आग्रही आहेत. सत्ताधारी सभागृहात तर विरोधक प्रशासनाकडे लेखी निवेदनातून आग्रह धरत असतानाही आजही नेरूळ सेक्टर सहा परिसरातील रहीवाशांच्या संग्रही तेच ते ओसाड मार्केटच पहावयास मिळत आहे.
कै. नारायण पाटील या कार्यसम्राट नगरसेवकाने या परिसराचे नवी मुंबई महापालिका सभागृहात 15 वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. सतत पायी चालणार्या व प्रभागात घरटी जनसंपर्क ठेवणार्या नगरसेवक नारायण पाटील यांच्यामुळे परिसरात उद्यान व क्रिडांंगण विकसित झाले, त्याशिवाय नागरी सुविधाही उपलब्ध झाल्या. परिसरात पदपथावर बसणार्या भाजी विक्रेत्यांकरिता हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता त्यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत भाजी मार्केटची निर्मिती केली.
भाजी मार्केट बांधून झाल्यावर पालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूका त्वरीत झाल्या. त्यामुळे भाजी मार्केटचा लोर्कापण सोहळा रखडला, तो आजतागायत कायम आहे. हे मार्केट लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी स्थानिक नगरसेविका जयश्री ठाकूर आणि स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील यांनी सभागृहात वारंवार प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेत कार्यरत असणारे प्रल्हाद पाटील यांनीही हे मार्केट लवकरात लवकर सुरु करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा सुरू केलेला आहे. स्थानिक शाखाप्रमुख दिलीप आमले यांनीदेखील पालिका अधिकार्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेवून मार्केट सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे मार्केट सुरू करण्यासाठी नगरसेविका जयश्री ठाकूर आणि स्वीकृत नगरसेवक सुरज पाटीलही प्रयत्न करत आहे.
पालिका प्रशासनाने मार्केट बांधले असले तरी मार्केटची रचना चुकीची असल्याचा आरोप स्थानिक भाजी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. मार्केटमध्ये गाळे छोटेखानी बांधण्यात आले असल्याने या ठिकाणी व्यवसाय करणे अवघड असल्याचे स्थानिक भाजी विक्रेते सांगत आहे. मार्केटचे लोर्कापण न झाल्याने सेक्टर सहा परिसरात पदपथावरच फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले असून रहीवाशांना अंतर्गत भागातील वर्दळीच्या रस्त्यावरून वाहनांचा ससेमिरा चुकवित ये-जा करावी लागत आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हे चित्र असतानाही पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नसल्याची नाराजी रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हे मार्केट लवकर सुरू झाल्यास परिसरातील महिलांना एकाच जागेवर सर्व भाजी विक्रेते उपलब्ध होतील आणि त्यांना पाहिजे ती भाजी एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. मार्केट सुरू होण्यास विलंब होत असल्याने परिसरातील महिलांची गैरसोय होत असल्याची नाराजी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांनी व्यक्त केली आहे.