दिपक देशमुख
नवी मुंबई : बेलापुर येथील आयटीआय विविध समस्यांच्या विळख्यात असून विद्यार्थ्यांना तेथील कोंडवाड्यात शिक्षण घ्यावे लागत आहे. येथील असुविधांबाबत, समस्यांबाबत महिनाभरात सुधारणा न झाल्यास एक महिन्यानंतर आयटीआयला टाळे ठोकण्याचा इशारा युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी आयटीआयच्या प्राचार्यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
आयटीआय परिसराचा युवा सेनेच्या वतीने पाहणी अभियान राबविले असता, विविध गैरसोयी, असुविधा आणि समस्या निदर्शनास आल्या. त्यामुळे हे सरकारचे आयटीआय आहे का, बकालपणाचा कोंडवाडा आहे हेच समजेनासे झाले आहे. यापेक्षा महापालिका शाळा सुस्थितीत असल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे. या बकालपणात, कोंडवाड्यात मुलांना आयटीआयचे कितपत सक्षमरित्या प्रशिक्षण दिले जात असेल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे या समस्यांचा, असुविधांचा ऊहापोह आपणापुढे करत असून लवकरात लवकर या समस्येवर कार्यवाही आम्हाला अपेक्षित असल्याचे निखिल रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
आयटीआयमध्ये प्रवेश करताना मुख्य द्वार बंद असल्याचे निदर्शनास आले. मागील बाजूने आयटीआयमध्ये प्रवेश करावा लागत असून हे प्रवेशद्वार तुटलेल्या अवस्थेत आहे. कार्यरत असणार्या सुरक्षा रक्षकाकरिता कोणतेही केबिन उपलब्ध नाही. नवीन ईमारत बांधून तयार असतानाही या ईमारतीत कारभार स्थंलातरीत करण्यात आलेला नाही. कोणास दुखापत झाल्यास उपचाराकरिता वैद्यकीय व्यवस्था तसेच याकरिता रूमही उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांकरिता उपहारगृह उपलब्ध नाही. वर्कशॉपची दुरावस्था झाली असून वर्कशॉप व संरक्षक भिंतीची पडझड झाल्यास जिवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. संरक्षक भिंत पदपथावर पडण्याची शक्यता असून पादचार्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत आहे. नवीन इमारतीच्या बाजूस खोदकाम झाले असुन ते गटर आहे अथवा पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेले खोदकाम आहे, याचा उलगडा होत नाही. या ठिकाणी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना यामुळे जाणिवपूर्वक साथीच्या आजाराकडे ढकलत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासह अन्य विविध समस्या आमच्या निदर्शनास आल्या आहे. या कोंडवाड्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आयटीआयच्या कोंडवाड्यात आपला देश मेक इन इंडियाचे स्वप्न कसे पूर्ण करणार याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. आयटीआय आवारात भंगारात पडलेली वाहने दिसत आहेत. या ठिकाणी साप व नाग निघत असून विद्यार्थ्यांच्या जिविताविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे निखिल मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपणास या असुविधा सोडविण्यासाठी युवा सेनेच्या वतीने एक महिन्याचा कालावधी देत आहोत. 5 सप्टेंबरपर्यत आयटीआयने या असुविधा सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनीच युवा सेनेच्या वतीने आयटीआयला टाळे ठोकण्यात येईल आणि होणार्या परिणामाला आयटीआयचे स्थानिक व्यवस्थापनच जबाबदार राहील. या कोंडवाड्यात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे शोभनीय व भूषणावह नसल्याने आम्हाला नाईलाजास्तव विद्यार्थी हित लक्षात घेता टाळे ठोकण्याची वेळ आपण आणू नका, यासाठीच आम्ही आपणास एक महिन्याचा कालावधी देत आहोत असे निवेदनाच्या अखेरिस निखिल रतन मांडवे यांनी म्हटले आहे.
यावेळी निखिल मांडवे यांच्यासमवेत उप-युवा अधिकारी सिध्दाराम शिलवंत, चिटणीस प्रविण कांबळे, समन्वयक सुशील सुर्वे, अजित खताळ, उप-विभाग अधिकारी मनोज जाकते, शाखाधिकारी सचिन कवडे, सुनिल सानप, मनोज डोंगरे, उप-शाखाधिकारी अजय गरड, साईश जाधव, जयेश कांबळे, ओमकर उपस्थित होते.