दिपक देशमुख
नवी मुंबई : महानगरपालिकेकडे घणसोली नोड हस्तांतरित होवून पाच महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी या विभागातील आजपर्यंत वाहतुकीच्या समस्या सोडविण्यास मनपाला अपयश आले असून त्या सोडविव्यात म्हणून सेवा संस्कृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी आयुक्त एन.रामस्वामी यांना पत्र देऊन मागणी केली आहे.
घणसोली नोड सिडकोकडे असल्यामुळे बर्याच समस्या या परिसरात होत्या. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हस्तांतरितच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन घणसोली नोड मनपाच्या कार्यक्षेत्रात घेतला. घणसोली नोड मनपाकडे वर्ग झाल्यानंतर मूलभूत समस्या सुटतील अशी अटकळ केली जात असतानाच सध्या येथे अनेक समस्या आ वासून आहेत.
घणसोली नोड परिसरात अनेक इमारती विकसित होत आहेत. बहूतांशी नागरिकांन कडे वाहने असल्यामुळे सध्या घणसोली रेल्वे स्थानक समोरील चौक, हावरे चौक, आशापुरा चौक, डी मार्ट समोरील चौकात सिग्नल यंत्रणा व गतिरोधक नसल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न नेहमीच निर्माण होत असल्याचे विश्वास कांबळे यानी आपल्या पत्रात म्हटले आहे.
गतिरोधक नसल्यामुळे वाहने भरधाव जात असल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे त्रासाचे झाले आहे. यामुळे महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांना रास्ता ओलांडणे ही मोठी समस्या निर्माण झाल्याचे विश्वास कांबळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने अनेकदा छोटे मोठें अपघात होत असून अनेक वेळा वाहन चालका मध्ये खटके उडत असून केव्हा केव्हा याचा परिणाम मोठ्या भांडणात होत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे घणसोली नोड मध्ये लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा व गतिरोधक यंत्रणा प्रथम बसवावेत अशी मागणीही या पत्रात केली आहे.
या बाबत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना विचारले असता,हे पत्र आम्हाला प्राप्त झाले असून पुढील कार्यवाही साठी घणसोलीचे कार्यकारी अभियंत्यांकडे पुढील कार्यवाही साठी पाठवले आहे असे सांगितले.