पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कोळीवाडा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात दुर्गंधी असल्यामुळे कर्मचारी आणि रुग्णांना त्रास होत आहे. त्यामुळे गरीब गरजु रुग्णांसाठी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरु करावे अशी मागणी भाजपच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी शुक्रवारी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल महानगरपालिकेची लोकसंख्या जवळपास ८ लाख आहे. शासकीय रुग्णालयाची मागणी येथे वारंवार होत असते. एमजीएम सारखे खाजगी रुग्णालय येथे असले तरी त्यालाही मर्यादा पडत आहेत. म्हणूनच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा करून १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करून आणले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या शेजारी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभी आहे. सुविधांच्या वाढीव मागण्यांमुळे वाढीव निधीच्या प्रतीक्षेत हे रुग्णालय कार्यान्वित होत नाही. पनवेल शहरात झोपडपट्टीत राहणारे नागरिक नगरसेवकांककडे दवाखान्यासाठी म्हणून वारंवार पैशांची मागणी करीत असतात. त्यातूनच नगरसेविका दर्शना भोईर यांनी शासकीय आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी महापौर डॉ कविता चौतमोल,आयुक्त डॉ सुधाकर शिंदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.