पनवेल : पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सातत्याने उदभवणाऱ्या विद्युत पुरवठा संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी राज्याचे ऊर्जा, नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०१७ रोजी पनवेलमध्ये ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून या प्रश्नांसंदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले होते. तसेच या अनुषंगाने जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वीजप्रश्नांमुळे नागरिकांना मोठा प्रमाणात त्रास होत असल्याचे ना.बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
वीज ग्राहकांना त्रास होवू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन ना.बावनकुळे यांनी त्यावेळी देतानाच लवकरच पनवेलमध्ये जनता दरबार घेणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी पनवेलमध्ये जनता दरबार होणार आहे. यामध्ये नागरिकांना वीजेसंदर्भा तील समस्या मांडता येणार आहेत.