पनवेलकर नागरिकांची प्रातिनिधिक भावना निवेदनातून केली संघर्षने व्यक्त
मानेचे दुखणे घेवून आयुक्त अर्ध्या तासात उतरले रस्त्यावर!
पनवेल: सत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या अधिकाराला कात्री लागली की काय? की, ज्यामुळे आपला दरारा संपुष्टात अल्यागत पुन्हा शहरातील रस्ते, फुटपाथ व्यापून बेकायदेशीर बाजारपेठ वसली असल्याची विचारणा करणारे पत्र आज दुपारी 3.30 वाजता संघर्ष समितीने अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली दिले. त्या निवेदनाची दखल घेत मानेचे दुखणे अंगावर घेत महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे अनधिकृत बांधकाम विरोधी पथकासह अवघ्या अर्ध्या तासात रस्त्यावर उतरले. त्यांनी मुख्य बाजारपेठ आणि एसटी आगारासमोरील अतिक्रमणे काढून टाकली.
पनवेल शहरासह खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे आदी शहरातील रस्ते, फुटपाथ व्यापून अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसविले आहेत. सणासुदीच्या दिवसात गर्दीचा फायदा घेत सराईत चोरटे सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावून नेत आहेत. याबाबत आयुक्त डॉ. शिंदे यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली.
गेल्या काही वर्षापासून रस्त्यावर भाजीपाळा विक्री, हातगाडी व्यवसाय करणाऱ्यांचे राष्ट्रीय फेरीवाला योजनेअंतर्गत पुनर्वसन करावे. त्यांना मुख्य बाजारपेठेच्या परिसरात आसनव्यवस्था करून द्यावी, अशी संघर्ष समितीच्यावतीने कांतीलाल कडू यांनी मागणी केली. त्यावर बोलताना डॉ. शिंदे यांनी तो विचार सुरू असून लवकरच नियोजन करू असे सांगितले.
शहरात वाहतूक कोंडी होता आहे. काही वेळा रूग्णालयांसमोर वाहने उभी केल्याने तिथेच रुग्णवाहिका आडते. शिवाय मोठी रुग्णालये उभारताना अग्निशमन यंत्रणा आणि वाहनतळाचा अजिबात विचार केलेला दिसत नाही. संबंधित डॉक्टरांना याबाबतीत नोटिस बजावण्यात यावी, तसेच त्यांच्यावर वाहतूक खात्याच्या सहकार्याने दंडात्मक करवाई करावी अशी मागणी केली. यावर आयुक्त डॉ. शिंदे यांनी महापालिका मुख्य नगर अभियंता सुधीर कटेकर यांना माहिती देण्यास सांगितले.
महापालिका क्षेत्रात सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. बजबजपूरी माजली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, याबाबतीत जनजागृती सुरू आहे. गणेशोत्सव मंडळांची नुकतीच बैठक घेवून स्वच्छ भारत अभियानावर आधारित देखावे करणाऱ्या मंडळांना स्पर्धेतून पारितोषिके देण्यात येतील. त्यातून स्वच्छ भारत अभियान राबवता येईल, असे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळांना वडघर पुलावर मूर्ती विसर्जन करण्यासाठी ते पूल खुले करावे, अशी मागणी करताच तो प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क साधल्यास मार्ग काढता येईल, असे शिंदे म्हणाले.
पनवेल शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या राखडलेल्या कामाकडेही त्यांचे लक्ष वेढले, त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
संघर्षच्या उपाध्यक्ष माधुरी गोसावी यांच्या हस्ते आयुक्त डॉ. शिंदे यांना निवेदन दिले. कांतीलाल कडू, पराग बालड, उज्वल पाटील, भारती जळगावकर, किरण तळेकर आणि चंद्रकांत शिर्के, विक्रम रामधरणे उपस्थित होते.
नागरिकांची मानसिकता बदलायला हवी
………………………… ………………………
रस्ते, फुटपाथ व्यापून छोटे, मोठे व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करायला काहीच हरकत नाही. परंतु, लोकांनीच आता अशा व्यापाऱ्याकडून कोणतेही वस्तू खरेदी न करण्याची मानसिकता ठेवायला हवी. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांकडून खरेदी म्हणजे त्यांना एक प्रकारे अभय असते. म्हणून याबाबतीत नागरिकांची मानसिकता महत्वाची ठरेल. सुरूवतीला धडा घालून दिला आहे. थोडा सैज्ञानिक कामाचा व्याप आहे. महासभेची तयारी करणे, इतर कामे हातावेगळी करताना वेळ मिळत नाही. मात्र, एकदा रस्त्यावर उतरलो की शिस्त आपोआप लागेल.
– डॉ. सुधाकर शिंदे
महापालिका आयुक्त