*वाशी येथील दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत खोटा अहवाल सादर केल्याचे प्रकरण
नवी मुंबई:- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात झालेले अनेक भ्रष्टाचार उघडकीस येत होते, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनाही धमकीचे प्रकार बाहेर येत होते,शिक्षकांचाही छळ होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. याच प्रकारची दखल घेत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी अचानक इटीसी (E.T.C) केंद्राचा दौरा करून संचालिकेमार्फत झालेल्या भ्रष्टाचाराची वाचा फोडली. नवी मुंबई महापालिकेनेही सदर विषयाबाबत शासनाला खोटा अहवाल सादर केला होता. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदर विषयाबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत आवाज उठवून भ्रष्टाचारासंबंधीउच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही चौकशीचे आदेश दिले आहे.
दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात झालेल्या याच भ्रष्टाचारासंबंधी नगरविकास गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्या दालनात आज सुनावणी पार पडली. ETC संदर्भात विचारणा करण्यात आल्यावर उपायुक्त शिवाजी कदबाने यांनी मागीलप्रमाणेच खोटा अहवाल वाचण्यास सुरुवात केली. यावेळी सादर केलेला अहवाल कसा खोटा आहे, याचे पुरावेच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सर्वांसमक्ष राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांना दाखविले. यावेळी अधिकाऱ्यांनीही आपली चूक झाल्याचे कबुल करताच राज्यमंत्री महोदयांनी असे सक्षम अधिकाऱ्यांकडून चुका होत असतील तर सर्वप्रथम तुमच्यापासून कारवाई केली पाहिजे असे खडे बोल सुनावले. ETC केंद्राची चौकशी सुरू होताच केंद्रामध्ये झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी रजिस्टर मध्ये केलेले फेरफार, शालेय साहित्य,गणवेश, फर्निचर यांची केलेली खरेदी, संचालक या पदाची शासन मान्यता नसताना नियमबाह्य केलेली नियुक्ती, त्याचा इतकी वर्षे घेतलेला लाभ, संचालक पदासाठी सादर केलेली खोटी कागदपत्रे तसेच त्यांच्या ध्वनिफिती व चित्रफिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सादर करताच संबंधित अधिकारी यांनी विषयाबाबत टाळाटाळ करून आपली चूक असल्याचे मान्य केले. सदर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करताच नगरविकास गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी संबंधितांना खरा अहवाल सादर करण्यास सांगून दोषी संचालिकेवर गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात येईल,असे सूचित केले.
यावेळी कोकण उपायुक्त शिवाजी कादमाने, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त रमेश चव्हाण, अवर सचिव नवनाथ वाथ, चंद्रकांत तायडे, अधिकारी रवींद्र जाधव, महेंद्र सप्रे, तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.