नवी मुंबई : क्रिकेटच्या माध्यमातून चाळीशी ओलांडलेल्या नागरिकांना आरोग्याचे महत्व समजावे व त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने सन 2005 मध्ये “फोर्टी प्लस क्रिकेट” ही संकल्पना नवी मुंबईत प्रत्यक्षात कृतीत आणणारे मास्टर प्रदिप पाटील यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते, उप महापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपिठावर स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, सभागृह नेता जयवंत सुतार, क्रीडा समितीचे सभापती विशाल डोळस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्षप्रतोद व्दारकानाथ भोईर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षप्रतोद तथा पाणी पुरवठा समिती सभापती अंजली वाळुंज, भारतीय जनता पार्टी पक्षप्रतोद रामचंद्र घरत आदी उपस्थित होते.
“खेळातून आरोग्य” ही संकल्पना सर्वमान्य असली तरी त्याकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. मात्र मास्टर प्रदिप पाटील यांनी क्रिकेट खेळाविषयीची सर्वांच्या मनातली आवड लक्षात घेऊन सन 2005 मध्ये प्रथमत: तुर्भे गावातून 40 प्लस क्रिकेटची संकल्पना सुरु केली. आज नवी मुंबईतील ग्रामीण भागातील 30 संघ व नागरी भागातील 12 संघ अशा 40 प्लसच्या एकूण 42 संघातील खेळाडू वयाच्या चाळीशीनंतर क्रिकेटच्या माध्यमातून स्वत:चे आरोग्य जपत आहेत व सुदृढ शरीराचा आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश प्रसारित करीत आहेत.
40 प्लस क्रिकेटची ही अभिनव संकल्पना आता केवळ नवी मुंबई शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही तर तिचे लोण ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात पसरते आहे. भारताचे माजी कर्णधार तथा जागतिक किर्तीचे अष्टपैलू क्रिकेटपट्टू खेळाडू कपिल देव यांनीही सी.बी.डी. येथील 40 प्लस क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे खुलेपणाने कौतुक केले व चाळीशी नंतरच्या या खेळाडूंचा उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे असे उद्गार काढले होते. 40 प्लस क्रिकेटची अशी अभिनव संकल्पना नवी मुंबईतून सुरु करून राज्यव्यापी किर्ती मिळविणा-या मास्टर प्रदिप पाटील यांचा अशा उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने विशेष सन्मान केला.
त्यांच्यासोबतच इटली येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड स्कुल गेम्समध्ये 50/100/200 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत रौप्यपदक संपादन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी मुंबईचा नावलौकीक वाढविणारा आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू सिध्दांत खोपडे, तसेच सन 2016 – 17 मध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत तसेच सन 2011 पासून सातत्याने फुटबॉल खेळात उल्लेखनीय कामगिरी करणारी फुटबॉलपट्टू रिया टंक, त्याचप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल ते पणजी हे 650 किलोमीटरचे अंतर सायकलवर भ्रमण करीत 10 दिवसात पूर्ण करून या भ्रमणामध्ये ठिकठिकाणी वृक्षबीजारोपण करीत, निसर्गाच्या रक्षण आणि संवर्धनासाठी जनजागृती व नैसर्गिक संसाधनांचा मर्यादित वापर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणा-या रोहित आवसक या विद्यार्थ्याचाही उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.