सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून त्यामध्ये मोजकेच नगरसेवक अभ्यासू आणि आक्रमक स्वभावाचे ओळखले जातात. त्यातीलच प्रभाग ४२चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक देविदास हांडेपाटील हे एक होय. महापालिका सभागृहात महासभेच्या माध्यमातून तसेच स्थायी समिती सभेच्या माध्यमातून कोपरखैराणेच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला धारेवर धरणारे नगरसेवक म्हणून हांडेपाटील ओळखले जातात. मंगळवारच्या महासभेत (दि. १९ सप्टेंबर) कोपरखैराणेतील माता बाल रूग्णालयावरून चर्चा करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसची देविदास हांडेपाटील ही तोफ पालिका प्रशासनावर कडाडल्याचे पहावयास मिळाले.
मंगळवारी महासभेचे कामकाज सुरू होताच महापौर सुधाकर सोनवणे यांनी सभागृहात जादा विषय मंजुरी घेण्यास सुरूवात करताच नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी त्यास आक्षेप घेतला. कोपरखैराणेतील माता बाल रूग्णालयाची ईमारत धोकादायक झालेली असल्यामुळे ती इमारत तोडून नव्याने बांधण्यात यावी असा प्रस्ताव मागील महासभेत समंत झालेला असतानाच त्याच इमारत दुरूस्तीचा प्रस्ताव आजच्या महासभेत का आणण्यात आला आहे, याबाबत हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाला विचारणा केली. सुरूवातीला या विषयावर महापौर सुधाकर सोनवणे यांनी या विषयावर बोलण्यास आणि लक्षवेधी मांडण्याच्या मागणीला हांडेपाटील यांना परवानगी नाकारली होती. तथापि या समस्येवर हांडेपाटील यांची आक्रमक भूमिका आणि अन्य नगरसेवकांनी हांडेपाटील यांच्या भूमिकेला दिलेला पाठिंबा यामुळे महापौर सुधाकर सोनवणे यांना हांडेपाटील यांना या विषयावर सभागृहात बोलण्यास परवानगी द्यावी लागली.
महासभा बैठकीत कोपरखैरणें माता बाल रुग्णालयाला धोकादायक घोषित केल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटर एस एच जैन यांनी इमारत स्ट्रक्चरली सुरक्षित असून विशेष दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे आपल्या अभिप्रायात नमूद केल्याने अभियांत्रिकी विभागाने रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालिका प्रशासनाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. हा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला आहे, याच मुदद्यावरून नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनी शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याकडे जाब मागितला.
७० लाख रूपये खर्च करून महापालिका प्रशासनाने कोपरखैराणेच्या माता बाल रूग्णालय इमारतीची दुरूस्ती केली होती, २०१२ साली ही इमारत धोकादायक घोषित झाल्यामुळे अवघ्या ३ वर्षात ही इमारत धोकादायक कशी होवू शकते असा प्रश्न हांडेपाटील यांनी प्रशासनाला विचारला. धोकदायक घोषित झालेली इमारत पुन्हा नव्याने बांधण्याऐवजी त्या इमारतीची दुरूस्ती कशी होवू शकते याबाबतही हांडेपाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत ही इमारत पाडून नव्याने बांधण्याची मागणी केली.
पालिका आयुक्तांच्या उत्तरावरही हांडेपाटील यांचे समाधान न झाल्याने त्यांनी जैन यांचा अहवाल सभागृहाच्या पटलावर सादर करण्याची मागणी करत या महापालिकेत काही गोष्टी मॅनेज होत असल्याचा गंभीर आरोप केला. या धोकादायक इमारतप्रकरणी आयआयटी तसेच व्हीजेटीआयचा अहवाल मागविण्याची मागणी करत हांडेपाटील यांनी त्या तांत्रिक अहवालाचा जो निर्णय असेल तो आपणास मान्य असल्याचे हांडेपाटील यांनी सांगितले.
कोपरखैराणेतील धोकादायक माता बाल रूग्णालयप्रकरणी हांडेपाटील हे पोटतिडकीने बोलत असताना आणि स्थानिकांची भूमिका मांडत असताना महापौरांनी सुरूवातीला बोलण्याची परवानगी नाकारली आणि शेवटी या रूग्णालयाच्या इमारतीची आणखी तांत्रिक तपासणी करून ती इमारत दुरूस्त करावी अथवा नव्याने बांधावी असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.