नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छ विद्यालय असा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारी आंबेडकर नगर राबाडे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय न.मुं.म.पा. माध्यमिक शाळा क्र. 104 तसेच या शाळेतील राष्ट्रीय खो-खो पट्टू विद्यार्थिनी साधना गायकवाड आणि उच्च स्तरावरील बॅडमिंटन प्रशिक्षणासाठी 1 लक्ष रुपयाची शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उत्तम कांबळे यांचा आज महापालिका सर्वसाधारण सभेत राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, सभागृह नेता श्री. जयवंत सुतार, पाणीपुरवठा समिती सभापती तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षप्रतोद श्रीम. अंजली वाळुंज, स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्षप्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत – स्वच्छ विद्यालय’ या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आंबेडकरनगर, राबाडे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्र. 104 या शाळेने राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2016-17” प्राप्त केला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस देशात आठवा आणि महाराष्ट्र राज्यासह देशाच्या पश्चिम विभागात सर्वप्रथम क्रमांकाचा स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे. “स्वच्छ भारत – स्वच्छ विदयालय” या उपक्रमांतर्गत “स्वच्छ विदयालय पुरस्कार” सन 2016-17 साठी देशभरातून निवडण्यात आलेल्या 172 शाळांमध्ये महाराष्ट्रातील 15 शाळा असून ठाणे जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 104, आंबेडकर नगर या एकमेव शाळेची निवड करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ही आदर्श शाळा म्हणून नावाजली जात असून पुरेशी व स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सुयोग्य व्यवस्था यासह रेन वॉटर हार्वेस्टिंग, सुंदर बगीचा, कंपोस्ट खत प्रकल्प, इको टॉयलेट, सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा शाळेत उपलब्ध आहेत. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा ही येथील विद्यार्थ्यांची नियमित सवय आहे. त्यामुळेच या शाळेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक देशपातळीवर झालेला असल्याने या शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. मारुती गवळी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम. अलका ढवळे यांचा महापालिका सर्वसाधारण सभेत सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे या माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी साधना दत्तात्रय गायकवाड हिने 17 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय खो – खो स्पर्धेत छत्तीसगड येथे महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करीत राष्ट्रीय खो-खो पटू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याने तसेच या प्राथमिक शाळा क्र. 55 चा विद्यार्थी उत्तम बब्रुवान कांबळे याला पी.एन.बी. मेटलाईफ इन्शुरन्स को.ऑप.लिमी. आणि क्राय चाईल्ड राईटस् अँड यू या संस्थांमार्फत बॅडमिंटन खेळातील त्याची उत्तम कामगिरी पाहून व्यावसायिक स्तरावरील उच्च प्रशिक्षणासाठी रू. 1 लक्ष रक्कमेची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली असल्याने महानगरपालिका शाळेतील या दोन्ही गुणवंत क्रीडापट्टूंचा सर्वसाधारण सभेत अभिनंदनपर सन्मान करण्यात आला.