खारघरमध्ये सामाजिक सांस्कृतिक भवन उभारणार- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) कला, साहित्य व सांस्कृतिक कार्याला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून खारघरमध्ये सामाजिक सांस्कृतिक भवन उभारणार असल्याची ग्वाही भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे दिली.
हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून रे फाऊंडेशन खारघरच्यावतीने खारघर मधील सेक्टर ०४ येथील बालभारती पब्लिक स्कुलच्या ऑडिटेरियममध्ये ‘हिंदी भाषा गौरव सन्मान २०१७’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.
या सोहळ्यात ज्येष्ठ लेखक व अनुवादक सूरज प्रकाश, कवयित्री माधवी कपूर, मिनू मदान, कवी मनोहर अभय, अरविंद राही, चंदन अधिकारी, लेखक अशोक वशिष्ठ, पत्रकार सुधीर शर्मा व विनोद प्रधान यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ‘हिंदी भाषा गौरव सन्मान स्मृतिचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कवी, लेखक, पत्रकार, सहित्यिकांच्या कार्याचे गौरव आपल्या भाषणातून करतानाच अशा प्रकारच्या सोहळ्यातून गुणिजनांचा सन्मान करणे, म्हणजेच त्यांना प्रोत्साहन देण्याचे व पर्यायाने समाजाकडून गौरविण्याचे काम होत आहे, असे म्हटले. त्याचबरोबर या सोहळ्याच्या आयॊजनाबद्दल त्यांनी आयोजक निशा सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
सोहळ्याचे प्रास्ताविक भाजपच्या उत्तर भारतीय सेलच्या तालुकाध्यक्ष व रे फाऊंडेशनच्या अध्यक्षा निशा सिंह यांनी केले. राष्ट्रभाषेचा गौरव वाढविण्यासाठी रे फाऊंडेशनने हिंदी भाषेची सेवा व संवर्धन करणाऱयांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी साहित्यिकांनी आपल्या स्वरचित कविता सादरकरून उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यास भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, निलेश बाविस्कर, आरती नवघरे, संजना कदम, अनिता पाटील, नेत्रा पाटील, भाजपचे तालुका खजिनदार अनंता तोडकर, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक कीर्ती नवघरे, माजी सैनिक सेलचे जिल्हा संयोजक समशेरसिंग जाखड, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस समीर कदम, विनोद घरत, विनोद ठाकूर, यांच्यासह साहित्यिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.