नवी मुंबई:- नवी मुंबई कोपरी येथील 291 घरांवरील महापालिकेमार्फत होणाऱ्या तोडक कारवाईला विरोध करीत सदर कारवाईला स्थगिती मिळावी व तेथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांची घरे नियमित व्हावीत, याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची राज्याचे नगरविकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांजबरोबर बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांसोबत नगरसेवक विलास भोईर उपस्थित होते.
नवी मुंबई कोपरी येथील 291 घरांना महानगरपालिकेमार्फत नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. सदर गावातील ग्रामस्थांना त्यांच्या राहत्या घरांना तोडक कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. काही महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशनात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधानसभेत आवाज उठवून कोपरी गावातील नागरिकांच्या मदतीला धावून आल्या होत्या. सदर घरांवर तोडक कारवाई होऊ नये, याकरिता तेथील हजारो नागरिकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते. याच अनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नगरविकास गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, राज्य शासनाने राज्यातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीची बांधकामे नियमित करणेसंदर्भात ठराव समंत केला असून मा. राज्यपाल महोदयांनी त्यास मंजुरी दिली आहे. परंतु असे असतानाही नवी मुंबईतील गाव गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या सन2015 पूर्वीच्या घरांना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नोटीसी बजावण्यात येत आहेत. नवी मुंबईतील कोपरी गावांतील सुमारे 291 घरांना नवी मुंबई महानगरपालिकेने नोटीसा पाठविल्यात आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यशासनाने 31 डिसेंबर 2015 पूर्वीची बांधकामे नियमित करणेबाबतचा ठराव समंत केला असताना महापालिकेने दिलेल्या नोटिसा कशाच्या आधारावर दिल्या? त्यामुळे कोपरी येथील सदर घरांवर होणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यात येण्याची मागणी मंत्री महोदयांना करण्यात आली असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
राज्याचे नगरविकास गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांना सदर घरांवर कारवाईस स्थगिती देऊन सदर विषयाबाबत मंगळवार दि.30.01.2018 रोजी होणाऱ्या बैठकीस पालिका आयुक्त व सिडकोचे संबधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले.