नवी मुंबई :– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अनुषंगिक कामासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या भूधारकांना पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेप्रमाणे भूखंडाचे वाटपाची सोडत आज सिडको भवनमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 24 जानेवारी 2018 रोजी सिडको भवन, सातवा मजला, सभागृह येथे पारदर्शक पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली. या संगणकीय सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टच्या माध्यमातून सिडकोच्या संकेतस्थळावरून करण्यात आले.
आजच्या सोडतीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीत गाभा क्षेत्र व जीआरसी प्रकरणातील पुनर्वसन व पुनःस्थापना भूखंड प्रकारातील 31 ब्लॉक्समधील 86 भूखंडांची तर वाघिवली गावातील पुनर्वसन व पुनःस्थापना भूखंडांचे स्थलांतरण प्रकारातील 21 ब्लॉक्समधील 151 भूखंडांची काढण्यात आलेली ही तेरावी सोडत होती.
सोडतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करताना भूधारकाचे नाव, भूधारकाची पात्रता आणि उपलब्ध भूखंडांची संख्या या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी वडघर (चिंचपाडा) येथे भूखंड विकसित करण्यात आले आहेत. पुष्पकनगर आणि वडघर (चिंचपाडा) येथील ब्लॉक्स प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भूखंडांच्या क्षेत्रफळानुसार तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये ठराविक क्षेत्रफळाचे भूखंड असणार आहेत. सोडतीतील निर्णयानुसार ब्लॉकमधील भूखंड क्रमांक निश्चित करण्यात आले होते.
सदर सोडत काढण्यासाठी सिडकोच्या प्रणाली विभागाने खास प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीची वैधता भारत सरकारच्या संवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एसटीक्यूसी, पुणे (Standardization Testing & Quality Certificate Directorate) तर्फे चाचणी घेऊन प्रमाणित करण्यात आली आहे. प्रमाणित केलेली संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) सुरक्षा संकेतांक (Security Code) देऊन सुरक्षित करण्यात आली आहे. या सोडतीत भूधारकांचे नाव व भूखंड क्रमांक यांची सरमिसळ करण्यात येईल. ही सरमिसळ 9999 प्रकारे करण्याची सोय या प्रणालीमध्ये आहे. सोडतीवेळी 0001 ते 9999 यांपैकी कोणतीही एक चार अंकी संख्या सीड नंबर म्हणून उपस्थित मान्यवरांकडून घेऊन त्यानुसार यादृच्छिक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. प्रत्येक ब्लॉकसाठी स्वतंत्र सोडत काढण्यात आली.
सदर सोडतीच्या प्रसंगी पर्यवेक्षक म्हणून श्री. चंद्रलाल मेश्राम, निवृत्त न्यायाधीश, श्री. एस. एस. पाटील मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम, श्रीमती. अपर्णा वेदुला अतिरिक्त मुख्य नियोजनकार, श्री. किशोर तावडे अतिरिक्त मुख्य भूमी व भूमापन अधिकारी, श्री. निलेश चौधरी व्यवस्थापक प्रणाली व श्री. कमलाकर कांबळे वरिष्ठ पत्रकार, लोकमत उपस्थित होते.
सोडतीनंतर संपूर्ण निकालाचा तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निकालाची प्रत सिडकोच्या सूचना फलकावरदेखील प्रदर्शित करण्यात आली आहे. सोडतीमधील भूखंडांचे वाटप भूसंपादनाचा निवाडा जाहीर केल्यानंतर करण्यात येणार आहे. भूधारकांसाठी निश्चित करण्यात आलेले भूखंड त्यांच्या क्रमांक व क्षेत्रासह उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांना कळविण्यात येईल. त्यानंतर भूसंपादनासाठी देय्य होणाऱ्या मोबदल्याच्या ठिकाणी निवाड्यात उल्लेख करून निवाडा जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित भूधारकाला निश्चित केलेल्या भूखंडाचे वाटपत्र संपादित जमिनीचा ताबा घेताना देण्यात येईल. या प्रक्रियेनंतर सदरच्या भूखंडाचा भाडेपट्टा करार करण्यात येईल.