ठाकूरप्रणित भाजपाच्या तंबूत घबराट, सामाजिक संस्थांच्या प्रामाणिकतेचा विजय
पनवेल :- भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करत महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव पारित करणार्या भाजपाच्या सत्ताधार्यांसह त्यांच्या राजकीय ‘गुरूं’चे दात, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच घशात घातले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावर सत्ताधारी भाजपाने आणलेला अविश्वास ठराव निलंबित केल्याचा आदेश काढून पनवेलकरांच्या भावनांसह सामाजिक संस्थांच्या आंदोलकांवर विश्वास व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजूकडील अहवाल पाहून शासनाने तो ठराव निलंबित केला असल्याचे अध्यादेश आज, राज्यपालांच्या सहीने घोषित करून पनवेल भाजपाचा तंबू त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी उखडून टाकला आहे. या घटनेचे सामाजिक संस्थांनी स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पनवेलकरांच्यावतीने धन्यवाद दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावर भाजपाचे गटनेते परेश ठाकूर आणि त्यांच्या काही भाट नगरसेवकांनी तळी उचलत आयुक्तांवर घाणेरडे आरोप करत सभागृहात 26 मार्चला अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावाद्वारे गटनेते परेश ठाकूर तोंड फाटेपर्यंत सभागृहात आयुक्तांविरोधात गरळ ओकली होती. तर त्यांचे भाट आणि भोई टाळ्या वाजवून ‘येड्यांच्या जत्रेत’ सामिल झाले होते. सभागृहात अविश्वास ठरावावर चर्चा करताना, आयुक्तांवर भ्रष्टाचार करणे, हुकूमशाहीने वागणे, महापालिकेला डबघाईस नेणे, प्रशासनावर अंकुश न ठेवणे, जनतेमध्ये विनाकारण रोष निर्माण करणे आदी गंभीर आरोप केले होते.
तत्पूर्वी पनवेलमधील सामाजिक संस्थांनी जनतेचा विश्वासदर्शक ठराव मांडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. शहरातील चार हजार नागरिकांनी ठाकूर प्रणित भाजपाची दहशत मोडून आयुक्तांवर विश्वास व्यक्त करण्यासाठी मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर उपस्थिती दर्शविली होती. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मोठी मेहनत घेवून आयुक्तांवर जनतेचा विश्वास दर्शक ठराव पारित करून महाराष्ट्राच्या प्रशासनाबाबत नवा अध्याय रचला होता. विशेष म्हणजे त्यावेळीसुद्धा गुंडगिरी करत भाजपाच्या तंबूतील कार्यकर्त्यांनी ती सभा उधळवून लावण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी सक्षमपणे त्यांचा डाव हाणून पाडला. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात ठाकूरप्रणित भाजपाची छी थूॅ झाली होती.
त्यानंतर महापालिकेच्या सभागृहात सत्ताधार्यांनी मांडलेला ठराव 50 विरूद्ध 22 मतांनी संमत करण्यात आला. त्या ठरावाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली होती. त्यावर आयुक्तांचा अहवाल मागविण्यात आला होता. आयुक्तांनी शहरवासियांच्यासाठी राज्य शासनाच्या राबविलेल्या योजना आणि कामांचे प्रस्ताव शासनाला सादर केले होते. त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, प्लास्टिक बंदी, अतिक्रमणविरोधी कारवाई, शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या योजना तसेच उल्लेखनिय कार्यवाही केलेल्या कामांचा आढावा देण्यात आला होता. तसचे सत्ताधार्यांकडून पायाभूत सुविधा देण्यात होत असलेला अडसर याविषयी आयुक्त डॉ. शिंदे यांचा अहवाल उजवा ठरला.
शासनाने याबाबत निर्णय देताना महापालिकेतील सत्ताधार्यांनी आणलेला आयुक्तांविरोधी अविश्वास ठराव निलंबित केला असल्याचे राज्याच्या राज्यापालाच्या आदेशाने उपसचिव शंकर जाधव यांनी घोषित केले आहे.
***********************************
सत्ताधार्यांनी पनवेलच्या जनतेची माफी मागावी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलच्या जनतेवर विश्वास दाखवत महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधातील सत्ताधार्यांचा अविश्वास ठराव निलंबित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभाराचे आम्ही सामाजिक संस्थांच्यावतीने आभार मानत आहोत. तसेच राज्याचे दोन्ही विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंढे यांचे ऋृण व्यक्त करीत आहोत.
त्याच बरोबर राजकीय हूकूमशाही मोडीत काढून मुख्यमंत्री महोदयांनी सत्याच्या मार्गावरील पथिकांचे हात मजबूत करणारा शासन निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचा आदर राखून पनवेल, रायगड भाजपा आणि महापालिकेतील सत्ताधार्यांनी नैतिकतेचा स्वीकार करून पनवेलच्या जनतेची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया सामाजिक संस्थांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी या निर्णयावर दिली आहे.
– कांतीलाल कडू