दीपक देशमुख
नवी मुंबई : घणसोली येथील घरोदा बस स्थानक लगत असलेल्या अनधिकृत रिक्षा स्टँड व डी मार्टच्या व्यवस्थापनाने पार्किंग साठी असणारी जागा वेगळ्याच कामासाठी वापरल्याने वाहने कुठेही पार्किंग केली जात असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. यावर संबंधित प्रशासनाने योग्य कारवाई करून वाहतुकीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
घणसोली सेक्टर सातमध्ये घरोंदा बस स्थानक आहे. या ठिकाणी बेस्ट व एनएमएमटी या शहर बस उभ्या असतात. येथे या बसेसची गर्दी असतानाच ठाणे ऑटो रिक्षा संघटनेचा नियमबाह्य रिक्षा स्टँड आहे. या ठिकाणी अनेक रिक्षा उभ्या रहात असल्यामुळे नागरिकांना व बस चालकांना आपली बस काढताना भयानक त्रास होत आहे. विशेष म्हणजे बस थांब्यापासून ५० फुटावर रिक्षा स्टँड असावे असे परिवहन विभागाचे संकेत असतानाही हा रिक्षा स्टँड बस थांब्यापासून दहा फुटावरही नसल्यामुळे वाहतूक विभाग कारवाई करण्यास डोळेझाक का करत आहे?असा सवाल विचारला जात आहे.
रिक्षा स्टँड शेजारीच डी मार्ट आहे. डी मार्टचा तळमजला पार्किंगसाठी राखीव आहे. परंतु डी मार्ट व्यवस्थापनाने तळ मजल्याचा वापर गोदामासाठी केला आहे. त्यामुळे डी मार्टमध्ये कार्यरत असणार्या कर्मचार्यांची वाहने पदपथ व मोकळ्या जागेवर उभी केली जात आहेत. त्याचबरोबर साहित्य खरेदी करण्यासाठी येणार्या ग्राहकांची वाहनेही मोठ्या प्रमाणात पदपथ व मोकळ्या जागेवर उभी राहत असल्यामुळे येणार्या व जाणार्या नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे. इतकी मोठी समस्या येथे उभी राहिली असतानाही वाहतूक पोलीस व मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे असा सवाल रोहन कदम या तरुणाने विचारला आहे.
याबाबत वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खोदरे यांना विचारले असता, यासंदर्भात मनपा सहाययक आयुक्त दत्तात्रय नागरे यांची भेट घेऊन कारवाई कशी करायची याचा निर्णय घेऊ असे सांगितले. तर अतिक्रमण विभागाचे अभियंता रोहित ठाकरे यांना विचारले असता डी मार्ट ने पार्किंगची जागेचा दूरउपोयोग केला असेल तर निश्चित कारवाई केली जाईल असे सांगितले.