जय लहुजी सामाजिक संस्थेची मागणी
अमोल इंगळे
नवी मुंबई : नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मातंग समाजाचे बांधव वास्तव्यास आहेत.मातंग समाजाला एक संघ आणि त्यांच्या वैचारिक विचारणीला एकत्रितपणे न्याय मिळवा. समाजाला एक वास्तू मिळावी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव असे नवी मुंबईतही सर्वांच्या मनात तेवत राहो या उद्देशाने जुईनगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक भवन उभारण्यात आले आहे. या वास्तूचे काम पूर्ण झाले असून येत्या १ ऑगस्ट २०१८ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकार्पण करावे अशी मागणी जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामी एन ,महापौर जयवंत सुतार आणि यांच्या सह सर्व प्रमुख सदस्यांना लेखी निवेदन करून करण्यात आले आहे. जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभंग व्यंकट शिंदे यांनी ६ जुलै रोजी लेखी निवेदन दिले आहे. नवी मुंबई महापालिकेने मातंग समाजाचे दैवत असणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक नवी मुंबईत उभारावे यासाठी संस्थेच्या वतीने लोकनेते गणेश नाईक यांना पालकमंत्री असताना लेखी निवेदन सादर केले होते.त्याबरोबर तत्कालीन महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे यांना लेखी निवेदन दिले होते.नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सानपाडा (जुईनगर) सेक्टर १० येथील भूखंड क्रमांक १८७ येथे ६ कोटी २५ लाख ६४ हजार रुपये खर्चून समाजभवन उभारले आहे .या समाजभवनाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून याचे उदघाटन न झाल्याने समाज बांधवांनी तसेच जय लहुजी सामाजिक संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे.समाज भवनाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण करून मातंग समाजाला न्याय द्यावा तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ द्यावे अशी मागणी जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभंग शिंदे यांनी केली आहे .येत्या १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून महिनाभर संपूर्ण देशभर यानिमित्त विविध कार्यक्रम राबविले जातात. त्या नुसार १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नवी मुंबई महापालिकेचे समाज भवन मातंग समाजासाठी खुले करावे अशी मागणी केली आहे.त्याच बरोबर मुंबई, ठाणे पुणे या प्रगत महापालिकांच्या प्रमाणे देशभरात आपला ठसा उठविणाऱ्या नवी मुंबईत महानगरपालिकेने देखील १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विशेष निधी आरक्षित करून करावी अशी मागणी देखील निवेदनात केली आहे. याबाबतचे निवेदन महापौर जयवंत सुतार ,स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी ,सभागृह नेते रवींद्र इथापे,राष्ट्रवादीचे पालिकेतील पक्ष प्रतोद डॉ.जयाजी नाथ त्यांच बरोबर विविध पक्षाचे गटनेते याना देण्यात आले आहे. मातंग समाजाला येत्या १ ऑगस्ट रोजी आयुक्त, महापौरांकडून जयंती दिनी भेट मिळेल अशी आशा संस्थेचे अभंग शिंदे यांनी व्यक्त केली आहे.