* भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकूः खा. अशोक चव्हाण * कार्यकर्त्यांशी थेट संवादासाठी प्रोजेक्ट शक्तीचा शुभारंभ
मुंबई : ग्रेसने 70 वर्षात देशातील लोकशाही टिकवली म्हणूनच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी 70 वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही म्हणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या महाराष्ट्र प्रभारीपदी निवड झाल्यानंतर खर्गे आज पासून दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आले आहे. आज सकाळी टिळक भवन दादर येथे ते काँग्रेसचे प्रदेश पदाधिकरी व जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणयासाठी सुरु केलेल्या प्रोजेक्ट शक्तीचा शुभारंभ केला. शक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांच्यात थेट संवाद सुरु होणार आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गर्शन करताना खर्गे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ७० वर्षांत काँग्रेसने काय केलं? असे मोदी विचारतात आम्ही काही केलं नसतं तर मोदी आज त्या खुर्चीवर बसले असते का? आम्ही लोकशाही टिकवली म्हणून एक चहावाला पंतप्रधान झाला. मोदी फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र दिसत नाही. रोज एक ब्रिज कोसळतोय आधी ते थांबवा, रेल्वे ट्रॅक सुधारा. मग बुलेट ट्रेनच्या गप्पा मारा. देशात गोरक्षणाच्या नावाखाली लोक मारले जात आहेत. दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींवर अत्याचार वाढले आहेत. देशात भीतीचे वातावरण आहे. संविधान टिकले तर हा देश टिकेल. राजकारणात सत्ता येते जाते पण विचारधारा टिकली पाहिजे. देशाचे संविधान टिकवण्यासाठी मतभेद विसरून एकत्र या आणि काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंन्द फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला ते म्हणाले की, आणीबाणी नंतरही काँग्रेसचं सरकार देशात होतं. पण भाजप आणि मोदींकडून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांची बदनामी करण्याचे काम जाणिवपूर्क सुरु आहे. मोदी ४३ वर्षापूर्वीच्या आणीबाणीबद्दल बोलतात मात्र देशात गेल्या चार वर्षापासून अघोषीत आणीबाणी आहे. देशात तणाव निर्माण करुन मतं कशी वाढतील यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. देशात फक्त मी आणि मी पणा सुरु आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांना अधिकार नाहीत. राज्यातले सरकार बोलण्यात ऑनलाईन कामात ऑफलाईन आहे. कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. नविन पीक कर्ज मिळत नाही. तरुणांना नोक-या नाहीत. व्यापार उद्योग ठप्प झाले आहेत. सरकार फक्त जाहीराचींवर कोट्यवधींची उधळपट्टी करित आहे. भाजपवाले २०१४ ला म्हणत होतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? देवेंद्रजी आता तुम्ही सांगा कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. हे सरकार बदलल्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत. या असंवेदनशील सरकारविरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. कुमार केतकर, माजी मंत्री आ. नसीम खान, माजी मंत्री वसंत पुरके यांनीही या मेळाव्याला मार्गदर्शन केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, श्रीमती सोनल पटेल, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री व अनुसुचीत जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे, सतेज पाटील, माजी न्यायमूर्ती व काँग्रेस नेते अभय ठिपसे माजी खा. भालचंद्र मुणगेकर यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.