पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांचा पाठपुरावा कायम
अमोल इंगळे :
नवी मुंबई :- नेरूळ सेक्टर सहामधील भाजी मार्केटसाठी सिडकोच्या आरक्षित भुखंडावर महापालिकेने भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वी मार्केट बांधले व पालिकेचेच अनधिकृत मार्केट पालिकेने तोडून एक महिना लोटला तरी मैदानात पसरविलेले पत्रे व लोखंडी ऍगल अद्यापि तसेच पडून आहेत. ते तातडीने हटविण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी पालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्यांकडे लेखी तक्रारपत्रातून केली आहे.
प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमधील दत्तगुरू व वरूणा सोसायटीच्या मध्यभागी मैदानात सिडकोने मार्केट व सर्व्हिस स्टेशनसाठी आरक्षित असलेल्या भुखंडापैकी मार्केटच्या जागेवर महापालिका प्रशासनाने जवळपास २५ लाख रूपये खर्च करून मार्केट बांधले होते. तथापि आरक्षित भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच मार्केट उभारले गेल्याने ते अनधिकृत ठरले. ते मार्केट शुक्रवार ८ जुन रोजी महापालिका प्रशासनाने पाडले. आज या घटनेला एक महिना व एक दिवस उलटला तरी मार्केटचे पत्रे मैदानावर पडलेले उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मार्केटचे डेब्रिज उचलण्यासाठी आम्हीच आपणांकडे तीन वेळा लेखी तक्रारपत्र सादर केली होती. या पत्र्यांमुळे रात्रीच्या अंधारात दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. आमच्या तीन पत्रांमुळे आपण ते डेब्रिज हटविले असले तरी आता ते मार्केटचे मैदानात पसरलेले लोखंडी पत्रे उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाला कोणा ज्योतिषाकडून मुहूर्त शोधत आहे काय, असा संतप्त सवाल पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी केला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. पत्र्याच्या माध्यमातून साचलेले पाणी साथीच्या आजाराला खतपाणी घालण्याची भीती आहे. या पत्र्यामुळे त्या भागाला आलेला बकालपणा आजही कायम आहे. जे मार्केट तोडले आहे, त्याचे मैदानावर आजही पसरलेले लोखंडी पत्रे तेथून हटविण्यात यावेत. मैदान असल्याने कोणी लहान मुले खेळताना त्या पत्र्याच्या जवळ जावून जखमी झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी महापालिका प्रशासनाची असेल, याची आपण दखल घ्यावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आपण शक्य तितक्या लवकर मैदानात पडलेले लोखंडी पत्रे उचलण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, ही आपणास नम्र विनंती. आपल्यासारखा चांगला माणूस व कार्यक्षम अधिकारी या खुर्चीवर असताना तक्रारपत्र द्यावे लागते याचेच शल्य वाटत असल्याची नाराजी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी व्यक्त केली आहे.