* मंत्र्यांची नावे देऊन केले खड्ड्यांचे नामकरण * खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धेचे आयोजन
नवी मुंबई : खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या सायन पनवेल महामार्गाबाबत नवी मुंबई मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे येथे महामार्गावर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप-सेना सरकार व PWD अधिकारी यांचा निषेध करत महामार्गावरील खड्ड्यांना “हा मा. मंत्री एकनाथ शिंदे खड्डा”, “हा मा. मंत्री प्रवीण पोटे खड्डा”, “हा मा. मंत्री चंद्रकांत पाटील खड्डा” असे फलक खड्ड्यांमध्ये उभे करून खड्ड्यांना मनसे तर्फे नावे देण्यात आली. मोठ्या खड्ड्यांमध्ये यावेळी लांब उडीची स्पर्धा देखील मनसे तर्फे भरवण्यात आली होती. विजेत्यांना कमळ व धनुष्यबाणाची प्रतिकृती मनसे तर्फे देण्यात आली. सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यमुखी पडलेले पोलीस हवालदार व नागरिकांना याप्रसंगी मनसे तर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते. “निषेध असो, निषेध असो, भाजप-सेना सरकारचा निषेध असो”, “दरवर्षी का हे खड्डे, बंद करा भ्रष्टाचाराचे अड्डे”, “या भ्रष्ट सरकारच करायचं काय, खाली डोक वरती पाय”, “कंत्राटदार भाजप खासदार संजय काकडेला अटक करा, अटक करा”, “साफ नियत, सही विकास, जनतेला मात्र खड्ड्याचा त्रास”, “रस्त्यात खड्डा कुणाचा, मंत्री-कंत्राटदाराच्या युतीचा” अशा घोषण देत मनसैनिकांनी सायन पनवेल महामार्ग दणाणून सोडला.
मनसेचे आंदोलन सुरु असतानाच NMMT ची बस प्रवाश्यांसहित शेजारील खड्ड्यात अडकून बंद पडली. यावेळी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी तात्काळ मनसैनिकांना सूचना देत खड्ड्यात बंद पडलेल्या बसला धक्का देऊन बाहेर काढण्यास सांगितले. मनसे पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बस खड्ड्यातून बाहेर निघाली व पुन्हा मनसेने आंदोलन सुरु ठेवले.
१२०० कोटी खर्च करून बनविलेल्या चोवीस किमी. लांबीच्या या सायन पनवेल महामार्गाची दरवर्षी अशी दयनीय अवस्था होते व त्यावर काहीच ठोस कारवाई सरकार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात नाही. सध्याच्या घडीला दोन चाकी वाहने व छोटया वाहनांना सायन पनवेल महामार्ग प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला असन, या पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांची सर्व जबाबदारी ही युती सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग व मंत्र्यांची असल्याचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कंत्राटदार व मंत्र्यांची अभद्र युती असल्यानेच महामार्गाची दुर्दश झाली असून, युती सरकार मध्ये हिम्मत असल्यास कंत्राटदार असलेले भाजप खासदार संजय काकडे यांना अटक करून दाखवावी असे जाहीर आव्हान देखील याप्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिले.
महामार्गाची झालेली ही दुर्दशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यांदेखत होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री झोपेच सोंग घेतल्या प्रमाणे सर्व परिस्थिती जैसे थे ठेवत असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कंत्राटदाराचे हीत जपण्यातच भाजप मुख्यमंत्री व सेना मंत्र्यांना जास्त रस असल्याचा आरोप मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
दरवर्षी सर्वसामान्यांचे बळी जात आहेत आणि सरकार फक्त डागडूजी करून तात्पुरते खड्डे बुजवत आहे. मात्र आता हे चालणार नाही. यापुढे पाच वर्षात एकही खड्डा पडणार नाही अशी लेखी हमी सरकारने जनतेला द्यावी आणि यापुढे सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे कोणाचा ही जीव गेला तर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा जाहीर इशारा मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी याप्रसंगी दिला.
यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे तसेच निलेश बाणखेले, संदीप गलुगडे, अनिथा नायडू, श्रीकांत माने, अप्पासाहेब कोठुळे, सविनय म्हात्रे, नितीन खानविलकर, नितीन चव्हाण, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, अभिजित देसाई, अमोल ऐवळे, सचिन कदम, शरद डिगे, रुपेश कदम, विश्वनाथ दळवी, विक्रांत मालुसरे, श्याम ढमाले, रमेश वाघमारे, मनोज क्षीरसागर, प्रसाद घोरपडे, निखील थोरात, सागर मांडे, स्वप्नील गाडगे, शिवम कवडे, नितीन नाईक, चंद्रकांत डांगे, विशाल चव्हाण, शेखर गावडे, आकाश पोतेकर,प्रेम जाधव, प्रवीण वाघमारे, विलास घोणे, सुहास मिंडे, अजय सुपेकर, कुमार कोळी, सखाराम संकपाळ, अक्षय भोसले, विष्णू बांगर, महेश कदम, अरुण पवार, अमोल गवांदे, , विशाल भिलारे, शीतल मोरे, दिपाली दमणे, दिपाली ढौळ, धीरज शिंदे, निखील गावडे, सुरेश शेळके, अमित पाटील, दिनेश पाटील, राम पुजारे, अमोल मापारी, अर्जुन देवेंद्र, अजय मोरे, तानाजी कांबळे, संकेत सरगर, शशिकांत कळसकर, विशाल नगरसे, हेमंत कुलकर्णी, श्याम अरगडे, अक्षय सुतार, भालचंद्र माने, वैभव बारवे, सचिन जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, किरण कोळी, सिद्धेश जगे, कय्याम शेख, अशोक भोसले, संजय खंडाळे, देव प्रसाद, उमेश गायकवाड, गणेश पाटील, भूषण बारवे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.