नवी मुंबई:- नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करावी तसेच सदर खड्डेमय रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण व काँक्रीटीकरण करणेबाबत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.श्री. प्रवीण पोटे यांजकडे मागणी केली होती याच अनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे.
तसेच खड्डयांमुळे वाहनांना हादरे बसून अपघाताचे प्रमाण वाढले होते. या बाबत मागील वर्षी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले होते. राज्यमंत्री महोदयांनी सदर खड्डेमय व खराब रस्त्यांचा पाहणी दौरा करून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना रस्त्यांतील खड्डे बुजवून डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्याचे आदेश दिले होते. सदर सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केले असून पावसाळ्यानंतर रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच लवकरच आपल्याला खड्डेमुक्त नवी मुंबई पाहायला मिळणार आहे.